
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन शुद्ध द्वादशी
वार – मंगळवार
नक्षत्र – आश्लेषा
योग – अतिगंड
करण – कौलव
राशी – कर्क
सध्या होलाष्टक सुरू असल्याने होळीपर्यंत कोणतीही शुभकार्य करता येणार नाहीत.
मेष
मेष राशीसाठी आजचे वातावरण उत्साह वाढवणारे ठरणार आहे. चतुर्थ स्थानात चंद्र असल्याने कौटुंबीक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचे बेत ठरण्याची शक्यता आहे. मात्र, व्यय स्थानात राहू असल्याने खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच लवकरच शनीची साडेसाती सुरू होणार असल्याने कामात अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या एकादश स्थानात शनि असल्याने आर्थिक आवक होण्याची शक्यता असल्याने आर्थइक स्थिती चांगली राहणार आहे. चंद्र आणि शनीचे चांगले पाठबळ असले तरी राहूमुळे काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ वार्ता मिळणार आहेत. होळीचा पर्वकाळ सुरू होत असतानाच अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, त्यासाठी जास्त मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागेल. तृतीय स्थानात चंद्र असल्याने कुटुंबीयांची चांगली साथ मिळणार आहे. आय स्थानात राहू असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. याआधीची गुंतवणुकीतून फायदा करुन घेण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रथम स्थानात गुरु असल्याने चांगले पाठबळ मिळणार आहे. नोकरीत बदली, बढतीचे योग आहेत. मात्र, कार्यक्षेत्रात मतभेद टाळण्याची गरज आहे.
मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. तसेच आत्मविश्वास आणि उत्साह वाढणार आहे. मात्र, दशम स्थानात राहू असल्याने कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. आळसामुळे आजची कामे उद्यावर ढकलल्यास कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक गोष्टींसाठी सहकार्य मिळण्याचे योग आहेत. मात्र, व्यय स्थानातील गुरुमुळे काही प्रमाणात खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार असून एखाद्या धार्मिक गोष्टीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, हातात पैसे असल्याने ताणतणाव दूर होण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक आहे. प्रथम स्थानात चंद्र असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. कोणतेही काम उत्साहात पूर्ण होणार आहे. मात्र, अतिआत्मविश्वासामुळे कामात चुका टाळण्याची गरज आहे. तसेच काही गोष्टींमुळे मनावर आलेले दडपण दूर होणार आहे. भाग्य स्थानात राहू असल्याने कोणाशीही मतभेद व्यक्त करू नये. कामांचे योग्य नियोजन केल्यास नशिबाची साथ मिळणार आहे. अष्टम स्थानात शनी असल्याने प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र,आता लवकच शनी भाग्य स्थानात संक्रमण करणार असल्याने अडीचीमध्ये आलेल्या अडचणी कमी होणार आहेत.
सिंह
सिंह राशीच्या लोकांचा आज दिवस अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. व्यय स्थानातील चंद्रामुळे अचानक नवे खर्च उभे ठाण्याची शक्यता आहे. उत्साह आणि आत्मविश्वास कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळेल त्या प्रत्येक संधीचे सोने करण्याची गरज आहे. गुरुच्या पाठबळामुळे अनेक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, अष्टम स्थानात राहू आणि व्ययातील चंद्रामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. व्यवसायातील भागीदार आणि सहकाऱ्यांशी वादविवाद टाळण्याची गरज आहे. सिंह राशीनी आजचा दिवस खर्चावर नियंत्रण ठेवल्यास दिवस समाधानाचा ठरणार आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांचा आज दिवस अनपेक्षित लाभाचा आहे. आय स्थानात चंद्र असल्याने गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. भाग्य स्थानात गुरु असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मात्र, सप्तम स्थानात राहू असल्याने जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानात शनी असल्याने स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हितशत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. येत्या काही काळात कर्ज घेणे टाळावे. तसेच उधारीउसनवारीचे व्यवहार करू नये. ही काळजी घेतल्यास होणाऱ्या आर्थिक लाभातून चांगला फायदा करून घेता येणार आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना आज कामाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कर्म स्थानात गुरु असल्याने अनेक कार्यक्षेत्रात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. मात्र, षष्ठ स्थानात राहू असल्याने हितशत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. मात्र, बुद्धीचातुर्याने त्यावर मात करणे शक्य होणार आहे. पंचम स्थानात शनी असल्याने मुलांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. गुतंवणुकीसाठी योग्य प्रयत्न केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य असल्याने कामाचा ताण जाणवणार नाही.
वृश्चिक
वृश्चिक राशीने आजचा दिवस नशीबाची चांगलीच साथ मिळणार आहे. त्याचा फायदा करून घेण्याची गरज आहे. भाग्य स्थानात चंद्र असल्याने मनातील अस्वस्थता दूर होणार आहे. अनेक समस्यांवर मार्ग सापडणार आहे. भाग्य स्थानातील चंद्रामुळे अचानक धनलाभ किंवा सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. संपत्ती किंवा केलेल्या गुतंवणुकीतून चांगला फायदा होणार आहे. शनीची अडीची म्हणजे चतुर्थ स्थानात असलेल्या शनीमुळे कुटुंबीयांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. मात्र, लवकरच अडीची संपणार असल्याने संकटातून मार्ग सापडणार आहेत.
धनु
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. अष्टम स्थानात चंद्र असल्याने जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची चांगली साथ मिळणार आहे. कौटुंबीक वादविवाद टाळण्यास घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. अष्टम स्थानात चंद्र असल्याने प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. चतुर्थ स्थानात राहू असल्याने कुटुंबाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. शनीची चांगली साथ मिळणार असली तरी षष्ठ स्थानातील गुरुमुळे काहीजण कामात अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. तसेच आता लवकरच अडीची सुरू होणार असल्याने अनपेक्षित अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांचा आज जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. चंद्र सप्तम स्थानात असल्याने व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ आहे. मात्र, जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी गेण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात जुन्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या चांगल्या संधी आता मिळण्याचे योग आहेत. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्वितीय स्थानातील शनीमुळे चांगले आर्थिक पाठबळ मिळणार आहे. लवकरच साडेसातीचा अखेरचा टप्पा संपत असल्याने सर्व अडचणी संपून नवे सकारात्मक पर्व सुरू होणार आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र असणार आहे. चंद्र षष्ठ स्थानात गुरुसोबत असल्याने साथीच्या आजाराचा किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांशी जुळवून घेतल्यास त्यांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तसेच संपत्ती किंवा आधी केलेल्या गुंतवणुकीतून अचानक चांगले आर्थिक लाभ होणार आहेत. प्रथम स्थानात शनी असल्याने नकारात्मक विचारांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यावर मात करत पुढे जाण्याची गरज आहे. मात्र, आता साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू होणार असल्याने अनेक अडचणी कमी होणार आहेत. तसेच आधी केलेल्या चांगल्या कामांचे फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. पंचम स्थानात चंद्र असल्याने घरासाठी सकारात्मक घडामोडी घडण्याचे योग होत आहेत. प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करत सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र, खर्च करताना विचार करावा लागणार आहे. पंचम स्थानात चंद्र असल्याने परदेशातून एखादी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तसेच आता लवकरच साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने सावध राहून कोणतेही व्यवहार करण्याची गरज आहे.