कॉलेजची फी भरण्यासाठी इंजिनीयरिंगच्या एका विद्यार्थ्याने चक्क चोरी केल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या चोरी करणाऱ्या इंजिनीयरला पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 24 लाख 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या इंजिनीयरचे नाव आकाश वाळकुंडे असे आहे. आकाश वाळकुंडे हा उरण-कुंडेगाव येथे त्याच्या आई व बहिणीसोबत राहतो. तो सध्या नवी मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनीयरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. पनवेलमधील एका मोबाईलच्या दुकानात आकाशने चोरी केली आणि लाखो रुपयांच्या मोबाईलवर डल्ला मारला.
गुन्हा दाखल होताच तपास गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर चोर हा आकाश वाळकुंडे असून तो उरण परिसरात राहत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून बेलापूर येथून त्याला अटक केली. आकाराकडून तब्बल 24 लाख 87 हजारांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. इंजिनीयरिंगच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी पैसे नसल्यानेच ही चोरी केली, अशी कबुली आकाशने दिली.
एटीएम कार्डची ‘हात की सफाई’ करून 16 हजार परस्पर काढले
पैसे काढण्याच्या बहाण्याने मोबाईल दुकानदाराच्या एटीएम कार्डची अदलाबदली करून भामट्याने साडेसोळा हजार रुपये काढल्याची घटना दापोडा येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक झा याला अटक केली असून तो उल्हासनगरमध्ये राहणारा आहे. विशाल शिरसाठ याचे मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. तो दापोडातील अॅक्सेस बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला. दीपकने पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएममध्ये शिरून विशाल पैसे काढत असतानाच त्याचा पासवर्ड बघून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली केली.
भिवंडीत स्कूल बसच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू
पायी जाणाऱ्या महिलेला स्कूल बसची धडक लागल्याने साठ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गैबीनगर परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच घबराट उडाली होती. जुबेदा गुलशेर खान (60) असे बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. सदर महिला गैबीनगर परिसरातील रस्त्यावरून चालत असताना स्कूल बसची धडक लागल्याने तिचा मृत्यू झाला.