महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे दरवर्षी पुलोत्सवाचे आयोजन होते. मात्र सध्या अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पुलोत्सव कसा आणि कुठे होणार, असा प्रश्न ‘पुल’प्रेमींना पडला आहे. अशातच दहिसर येथील ‘पुल’प्रेमींनी येत्या 5 ते 8 नोव्हेंबर रोजी ‘पुलोत्सव 2024’ चे आयोजन केले आहे.
दरवर्षी प्रभादेवी येथील पु. ल. कला अकादमीच्या प्रांगणात दरवर्षी आठवडाभर पुलोत्सव रंगतो. यामध्ये राज्यभरातील कलावंत सहभागी होतात. विविधरंगी कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना मिळते. ‘पुल’प्रेमी या महोत्सवाच्या प्रतीक्षेत असतात. सध्या अकादमीच्या वास्तूची डागडुजी सुरू आहे. हे काम जानेवारीनंतर पूर्ण होईल असा अंदाज आहे.
येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन आहे, तर 8 नोव्हेंबर रोजी पुलंचा जन्मदिन. याचे औचित्य साधून दहिसरच्या ‘प्रोजेक्ट शैलेंद्र’ , ‘अभिजात रंगयात्रा’, ‘सनविवि नाटय़शाला’ या संस्थांनी एकत्र येत पुलोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती पु. ल. कला अकादमीचे सल्लागार समिती सदस्य डॉ. शिरीष ठाकूर यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक आणि हौशी रंगकर्मींसाठी एकाभिनय तसेच अभिवाचनावर आधारित असा हा उत्सव आहे. याअंतर्गत पुलंसोबत व.पु. आणि जयवंत दळवी या आनंदयात्रींचे स्मरण केले जाईल. तिघांच्या साहित्याचे अभिवाचन तसेच साहित्यावर आधारित अभिनय सादरीकरण आणि नाटय़प्रवेश सादरीकरण करता येईल. एकाभिनय- 5 ते 7 मिनिटे, कथावाचन- 15 ते 20 मिनिटे, नाटय़प्रवेश 15 ते 20 मिनिटे असा कालावधी देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9029884055.