दादरमधील प्रसिद्ध आणि मानाची समजली जाणारी ‘आयडियल दहीहंडी’ या वर्षी ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ या संकल्पनेवर होती.
या दहीहंडी उत्सवामध्ये महिला अत्याचाराविरोधातील देखावा व तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा देखावा मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाने तिसऱया थरावर सादर केला. ‘महिलांची दहीहंडी’ हे आयडियलच्या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असते. या वर्षी ही हंडी पह्डण्याचा मान विलेपार्लेतील जॉली गोविंदा पथकाने पटकावला. त्यांनी दांडपट्टा आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. सायबर सुरक्षा जागरूकतेवर फ्लैश मॉब हा नृत्यप्रकार सादर झाला. याशिवाय पर्यावरणपूरक सण या विषयावर पथनाटय़ व मंगळागौर सादर करण्यात आले. नयन फाऊंडेशनच्या दिव्यांग व अंध बंधू-भगिनींच्या गोविंदा पथकाने दहीहंडी पह्डली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील प्रमुख कलाकार अभिषेक राहळकर व मयुरी देशमुख यांनी दहीहंडी पह्डून कार्यक्रमाची सुरुवात केली. साईदत्त मित्र मंडळ, बाबू शेठ पवार आणि आयडियल बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.