डहाणूच्या विवळवेढे पुलावर ‘पाइप कोंडी’, टँकरची कंटेनरला धडक

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर आज दुपारी 1 च्या सुमारास रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरने सिमेंट पाइप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरचालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धडक इतकी भीषण होती की सिमेंटचे पाइप आणि रसायन रस्त्यावर सांडल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली.

गुजरातहून मुंबईच्या दिशेने केमिकल टँकर घेऊन चालक निघाला. तो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर पोहोचला असता समोरील सिमेंटचे पाइप भरलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे टँकरचालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकरने कंटेनरला धडक दिली. या धडकेत टँकरच्या केबिनचा चक्काचूर झाला आणि चालक अडकला. अपघातानंतर टँकरमधून रसायन गळती झाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे रसायन ज्वलनशील नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ग्रामस्थ मदतीला धावले

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, महालक्ष्मी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून केबिनमध्ये अडकलेल्या टँकरचालकाला बाहेर काढले. यात टँकरचालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे. या कामामुळे महामार्गावरील अपघात वाढले आहेत.