डहाणूतील मुरबाड ग्रामस्थ बनवताहेत प्लास्टिकपासून तेल आणि वायू; तरुणाने किमया केली; लोकसहभागातून उभारला ‘पॅरोलिसिस प्लांट

महेंद्र पवार, डहाणू
प्लास्टिकचा ब्रह्मराक्षस रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत असले तरी त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे प्लास्टिकची डोकेदुखी कायम आहे, पण प्लास्टिकची ही पिडा नष्ट करून गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी डहाणू तालुक्याच्या मुरबाड गावातील एका तरुणाने एक जबरदस्त किमया केली आहे. त्याने चक्क लोकसहभागातून गावात एक ‘पॅरोलिसिस प्लांट’ उभा केला आहे. या प्लांटमध्ये प्लास्टिकपासून तेल आणि वायू तयार केले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त तर होईलच, पण फुकटात निर्माण होणाऱ्या वायू आणि तेलामुळे मुरबाड गाव इंधननिर्मितीतही स्वयंपूर्ण होणार आहे.

गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी डहाणूतील मुरबाड या आदिवासी गावातील ‘डिझाईन जत्रा’ या वास्तुकला संस्थेचे आर्किटेक्ट प्रतीक धानमेर यांनी प्लास्टिकच्या समस्येवर कायमचा तोडगा काढला. गोईनवी टेक्नॉलॉजीचे मनोज नटराजन यांच्या सहकार्याने ‘प्लास्टिक पॅरोलिसिस प्लांट’ उभारण्यात आला. शाळकरी मुलांच्या सहभागातून क्लीन-अप ड्राइव्ह घेऊन प्लास्टिक संकलन, विलगीकरणाचे काम सुरू केले. याचे उद्घाटन माजी शिक्षण अधिकारी मारुती वाघमारे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत धानमेर आदींच्या उपस्थितीत झाले. प्रकल्पाची पाहणी गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी केली.

देशातील पहिला प्लांट
ग्रामपंचायतीचे सरपंच रवी बेंदर यांच्या पुढाकाराने गावातील जागा, पाणी, वीज आदी सुविधा पुरवल्या गेल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी छोटू बागुल यांनीही या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. करूर वैश्य बँकेच्या आर्थिक सहाय्याने हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे आज मुरबाड हे देशातील पहिले लोकसहभागातून चालणारे ‘पॅरोलिसिस प्लांट’ असलेले गाव ठरले आहे. या प्लांटमध्ये दरवेळी सुमारे सात किलो प्लास्टिकचे विघटन करून त्यापासून ज्वलनशील तेल आणि वायू तयार केले जात आहे.