दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील फुलविव्रेत्यांच्या याचिकांची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. मुंबई महापालिकेने कुठलीही नोटीस न देता फुलविव्रेत्यांच्या दुकानांची शटर्स तोडली. पालिका अशा प्रकारे निवडक लोकांना टार्गेट करून मनमानी कारवाई करणार असेल तर ते खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद देत न्यायालयाने पालिकेला कारवाईबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. याप्रकरणी 27 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
दादर पश्चिमेकडील फुलविव्रेत्यांनी पालिकेच्या कारवाईविरोधात अॅड. अर्जुन कदम व अॅड. प्रदीप थोरात यांच्यामार्फत सहा याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी अॅड. थोरात यांनी केलेल्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत खंडपीठाने पालिकेला चांगलेच फैलावर घेतले आणि नोटीस न बजावता निवडक फुलविव्रेत्यांवर कारवाई कशी काय केली, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले.