तेथे कर माझे जुळती! शिवसेनाप्रमुखांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्त शिवतीर्थावर गर्दीचा महासागर उसळला. शिवसेना नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, लहान मुले, दिव्यांग, वृद्ध यांच्यासह राजकीय, सामाजिक, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि कडक ऊन असूनही मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक, शिवप्रेमी जनतेने साहेबांना मानवंदना देण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मुख्य रांगेबरोबरच मैदानाच्या बाजूला उभारलेल्या सफेद फुलांच्या कमानीतूनही बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत होते. कुटुंबासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त करत होते. महिलांनी भगव्या साडय़ा, पुरुषांनी गळ्यात भगवे उपरणे परिधान केल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. गुलाब आणि चाफ्याची फुले वाहून बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले जात होते. शिवसैनिक, कार्यकर्त्यांच्या छातीवर शिवसेना आणि बाळासाहेबांचे फोटो, मशाल चिन्ह असलेले बॅच अभिमानाने झळकत होते. अभिवादन करताना आणि केल्यानंतर फोटो, सेल्फी काढली जात होती. अखंड तेवत्या तेजस्वी ज्योतीच्या साक्षीने स्मृतीस्थळ गजबजले होते. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी,  शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, साईनाथ दुर्गे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम,  भारतीय विमा कर्मचारी सेना सरचिटणीस दिनेश बोभाटे, विभागप्रमुख  भाऊ कोरगावकर, महेश सावंत, जितेंद्र जानावळे, उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, उपसचिव प्रवीण महाले त्याचबरोबर शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, उपनेते, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.