हिंदुस्थानातील सर्वात कसोटीपटूंना घडवणारा क्रिकेट क्लब म्हणून अवघ्या जगात नावलौकिक असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याने आपल्या क्रिकेट अॅपॅडमीच्या माध्यमातून क्रिकेटपटू घडवण्यासाठी शोधमोहीम राबविणार आहे. येत्या 4 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 12 आणि 14 वर्षांखालील मुलांची निवड चाचणी घेतली जाणार असून त्यातील गुणवत्ता असलेल्या 20-20 मुलांची निवड करून त्यांना वर्षभर क्रिकेटतज्ञांकडून क्रिकेटचे धडे दिले जातील.
आजवर शिवाजी पार्क जिमखान्यातील 22 क्रिकेटपटूंनी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्यांच्या असंख्य खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवले आहे. त्याच या प्रसिद्ध जिमखान्याने मुंबईला अस्सल क्रिकेटपटू मिळावेत म्हणून 12 आणि 14 वर्षांखालील मुलांमधील क्रिकेटची गुणवत्ता शोधण्यासाठी येत्या सोमवारी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क जिमखान्यातून प्रशिक्षण मिळावे म्हणून या शिबिरात 500 पेक्षा अधिक शालेय क्रिकेटपटू गर्दी करतील, असा विश्वास जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर यांनी बोलून दाखवला. या चाचणीसाठी येणाऱया मुलांनी-विद्यार्थ्यांनी 12 आणि 14 वर्षे वयोमर्यादा सिद्ध करण्यासाठी आपला जन्मदाखला आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रात राहणारा असणे आवश्यक असल्यामुळे निवासाचा दाखलाही आणणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या चाचणी शिबिरातून निवड झालेल्या दोन्ही गटातील 20-20 मुलांना अॅपॅडमीच्या माध्यमातून वर्षभर विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही खानविलकर यांनी दिली. मुंबई क्रिकेटसाठी होतकरू क्रिकेटपटू घडवणे, हेच या शिबिराचे मुख्य ध्येय असल्यामुळे केवळ अस्सल गुणवत्ता असलेल्या मुलांचीच निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
गोठोस्करांचा आज 96 वा वाढदिवस
आपल्या आयुष्याच्या शतकाच्या दिशेने कूच करत असलेले आंतरराष्ट्रीय पंच आणि जिमखान्याचे माजी अध्यक्ष माधव गोठोस्कर यांचा 96 वा जन्मदिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर आणि काही मित्रमंडळी गोठोस्करांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी पुण्याला जाणार आहेत.