दादर रेल्वे स्टेशन, परिसरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक मोहीम

मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने जोरदार मोहीम सुरू केली असून आज दादर पश्चिम रेल्वे स्थानक आणि परिसरातील रस्त्यांवर कारवाई केली. त्यामुळे दादर रेल्वे स्टेशन पश्चिम आणि परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. पालिकेच्या या कारवाईचे प्रवाशांकडून स्वागत केले जात असून ही कारवाई केवळ एका दिवसापुरती दिखाऊपणाची ठरली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पालिकेकडून ‘बेकायदा फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आज दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन कारवाईला अधिक वेग देण्यात आला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे जी उत्तरचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी कळविले आहे.

बेकायदा वीजजोडण्या, वाटेवर बस्तान
मुंबईत सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या दादरमधील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांची संख्या वाढून अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत जी उत्तर विभागाच्या वतीने आज दिवसभर दादर रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सेनापती बापट मार्ग, रानडे मार्ग, डी’सिल्वा मार्ग या रस्त्यांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करीत अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. या अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी अनधिकृतपणे वीजजोडण्या घेतल्याचेदेखील निदर्शनास आले आणि त्या अनधिकृत वीजजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.