दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे पुरस्कार जाहीर; पंडित विश्वनाथ कान्हेरे, पंडित अरुण द्रविड, संजय मोने, चिन्मयी सुर्वे यंदाचे मानकरी

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार आज जाहीर झाले. पंडित विश्वनाथ कान्हेरे, पंडित अरुण द्रविड, अभिनेते संजय मोने, नाटय़दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे, समीक्षक भालचंद्र कुबल, अभिनेत्री चिन्मयी सुर्वे, संगीत विशारद रुत्विक आठवले, श्रृती पोटे, अभिनेत्री सावनी शेवडे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक केंद्रात होणाऱया सोहळय़ात पुरस्कारांचे वितरण होईल.

यावेळी गाथा सप्तशतिपासून आजपर्यंत बदलत गेलेली भाषेची रूपे ही गाणे व अभिवाचन यातून उलगडून दाखवणारा ‘इये मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रम सादर होईल. कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, बांधणी व सहभाग डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचा आहे. गिरीश दातार व गौरी देशपांडे यावेळी अभिवाचन करतील तर नेहा देशपांडे व समीहन सहस्रबुद्धे गायन करतील.