दादरचा परिसर दोन दिवसांपासून फेरीवालामुक्त, आता पालिकेकडून नियम मोडणारे दुकानदार लक्ष्य

दादरमधील व्यापारी संघाच्या पाठपुराव्यानंतर अखेर पालिका आणि पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात कडक धोरण अवलंबत स्टेशन (पश्चिम) जवळचे रस्ते मोकळे केले आहेत. गेले दोन दिवस सुरू असलेल्या कारवाईमुळे एरवी फेरीवाल्यांनी तुडुंब भरलेले रस्ते फेरीवालामुक्त झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर स्वच्छता राहत असून वाहतूक कोंडीही कमी झाली आहे. दादरमध्ये पेडर रोडवर चालल्याचा आनंद मिळत असल्याची भावना दादरकर व्यक्त करत आहेत.

कोविडनंतर दादरमधील परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या खूप वाढल्याची येथील दुकानदारांची तक्रार आहे. फेरीवाले इतके मुजोर आहेत की, त्यांनी पालिका, पोलीस यंत्रणाही मॅनेज केल्याचे रहिवासी सांगतात. कारवाईकरिता पालिकेची गाडी निघाली की त्याची पक्की खबर फेरीवाल्यांपर्यंत पोहोचवली जाते. पालिका कर्मचारी येण्याआधीच फेरीवाल्यांनी गाशा गुंडाळलेला असतो. हा प्रकार थांबवण्याकरिता गेल्या दोन आठवड्यांपासून दादर व्यापारी संघ पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अशा बारा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत अखेर पालिकेने बुधवारपासून कारवाईचा बडगा उगारत रस्ते फेरीवालामुक्त केले आहेत.

दादरमध्ये एरवी जाणवणारी वाहतूककोंडीही कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया संघाचे अध्यक्ष एस. डी. शहा यांनी दिली. अर्थात हे चित्र यापुढेही कायम राहील का याबद्दल येथील दुकानदार आणि रहिवासी साशंक आहेत. पालिकेने दुकानदारांवरही कारवाई आरंभली आहे. काही दुकानाच्या पायऱ्यांवर लावलेल्या मॅनेक्विनही (पुतळे) काढले गेले. दुकानदारांची या कारवाईला हरकत नाही. दादर फेरीवालामुक्त करण्याकरिता आम्ही सहकार्यच करू. मात्र, दुकानदारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करू नये, असे दादर व्यापारी संघाचे सचिव दीपक देवरूखकर म्हणाले.

येऊ कारे…

पालिका कर्मचारी फेरीवाल्यांवर कारवाईकरिता निघाले की त्याची पक्की खबर आधीच मिळते. त्याकरिता येऊ कारे… असा कोडवर्ड वापरला जातो. येऊ कारे… असा संदेश आला की फेरीवाले सावध होतात. पूर्वी एखाद्या फळीवर विक्रीचे सामान मांडले जात असे. परंतु, आता सहज सरकवता येतील अशा ट्रॉली वापरल्या जातात. त्यामुळे खबर मिळाली की विक्रीचा माल हलवणे सोपे जाते.