च्यवनप्राशची लढाई हायकोर्टात; ‘पतंजली’च्या जाहिरातीवर ‘डाबर’चा आक्षेप

च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून ‘डाबर इंडिया’ आणि ‘पतंजली आयुर्वेद’ यांच्यात आता उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. पतंजलीकडून जाहिरातीच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात येत आहे, असा दावा डाबरने केला आहे. पतंजलीकडून केले जाणारे दावे आणि जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे आक्षेप यापूर्वीही घेण्यात आले आहेत. आता डाबर आणि पतंजलीमधील वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

काय आहे जाहिरात?

पतंजलीच्या च्यवनप्राशमध्ये 51 औषधी वनस्पती असल्याचे म्हटले आहे; पण त्याच जाहिरातीमध्ये डाबरच्या च्यवनप्राशमध्ये केवळ 40 औषधी वनस्पती असल्याचे सूचित केले आहे. पतंजलीच्या जाहिरातीमुळे आमच्या ग्राहकांच्या विश्वासाला तडा जात असल्याचे डाबरने याचिकेत म्हटले आहे. याच जाहिरातीमध्ये रामदेव बाबा ‘ज्यांना आयुर्वेद आणि वैदिक परंपरांचे ज्ञान नाही, ते अस्सल च्यवनप्राश तयार करू शकत नाहीत,’ असे म्हणत असल्याचे ऐकू येते. यावरही डाबरने आक्षेप घेतला आहे. त्यांचे हे विधान म्हणजे पतंजलीचे उत्पादन अस्सल आणि इतर बॅण्ड्स निकृष्ट आहेत, असेही डाबरने याचिकेत म्हटले आहे.

जाहिरातीत ‘डाबर’चे नाव घेतले नाही – पतंजली

पतंजलीने उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडले. आमच्या जाहिरातीत काहीही चुकीचे नाही. जाहिरातीद्वारे प्रत्येक बॅण्ड आपल्या उत्पादनांची माहिती देत असतो. आम्ही जाहिरातीत डाबरचे नाव घेतले नाही किंवा त्यांच्या उत्पादनांशी थेट तुलना केलेली नाही, असे पतंजलीने न्यायालयात सांगितले.