मुंबईच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेले डबेवाले तसेच चर्मकार बांधवांना बाप्पा पावला आहे. त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता साकार होणार आहे. त्यांना 25 लाखांत 500 चौ. फुटांचे घर मिळणार आहे. येत्या 3 वर्षांत ते मालकीच्या घरात पाऊल ठेवणार आहेत.
पंतप्रधान आवास योजनेतून डबेवाल्यांना आणि चर्मकार बांधवांना घरे देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. मुंबईच्या डबेवाल्यांसाठी 500 चौ. फुटांची 12 हजार घरे बांधली जाणार आहेत. त्यात चर्मकार समाजातील बांधवांसाठीही घरे राखीव ठेवली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका रियालिटी देणार आहे. ना नफा तत्त्वावर नमन बिल्डर्स हे बांधकाम करणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर आज डबेवाले संघटनेचे पदाधिकारी तसेच चर्मकार निवारा असोसिएशनच्या पदाधिकाऱयांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज आदी उपस्थित होते.
मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार बांधवांच्या हक्काच्या घरांसाठी विकासक आणि शासन यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. मुंबईतील डबेवाल्यांच्या अचूक व्यवस्थापनाची जागतिक पातळीवर ख्याती आहे.