
फेंगल चक्रीवादळाचे पुद्दुचेरी आणि चेन्नईला प्रचंड हादरे जाणवले. पुद्दुचेरी आणि चेन्नईत आलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले, वाहतुकीवर परिणाम झाला. या वादळाचा मोठा फटका विमानांनाही बसला. चेन्नई विमानतळ बंद ठेवावे लागले. जवळपास 28 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. याचदरम्यान, चेन्नईत धावपट्टीवर विमान लँड होईल असे वाटत असतानाच चक्रीवादळामुळे लँडिंगमध्ये अडचण येते. त्यामुळे विमान अक्षरशः हलताना दिसते. हेलकावे खात लँडिंग जोखमीचे असल्याचे लक्षात येताच विमान पुन्हा आकाशात झेपावले. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
चेन्नईत अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कृती आराखडा तयार केला असून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, संपूर्ण चेन्नई शहर पाण्याखाली गेल्याने बहुतांश अम्मा कॅन्टीनमध्ये मोफत जेवण देण्यात आले. दरम्यान, वादळाचा प्रभाव सध्या ओसरला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दुकाने बंद, व्यवसाय ठप्प
शहरातील दुकाने बंद असून व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे एनडीआरएफ आणि लष्करासमोर मोठे आव्हान आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत विल्लुपुरम येथे तुफान पाऊस झाला. मैलम जिह्यात 49 सेमी, तर नेम्मेली येथे 46 सेमी आणि वनुर येथे 41 सेमी पाऊस झाला.
- 32 मदत शिबिरे उभारण्यात आली असून त्यात 1 हजार नागरिकांना सुविधा देण्यात येईल. पाणी आणि अन्नाचा पुरवठा करण्यात येणार आहे. आज तब्बल 9.10 लाख अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. अम्मा कॅन्टीनच्या माध्यमातून 1.07 लाख लोकांना मदत पुरवण्यात आली.
- फेंगलच्या प्रभावामुळे पुद्दुचेरीत 46 सेंटिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. शनिवारी साडेपाचच्या सुमारास हे वादळ पुद्दुचेरीला पोहोचले. वादळामुळे पुद्दुचेरी, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रात मुसळधार पाऊस झाला.
- चेन्नईत 1 हजार 700 मोटर कंपच्या माध्यमातून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चेन्नईतील 22 सबवे पाण्याखाली गेले असून रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असल्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सांगितले.
हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
चक्रीवादळामुळे अनेक भागांत दोन दिवस वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस झाला. अनेक घरांचे नुकसान झाले, तर तिघांचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बोटीतून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफसोबत लष्करालाही या मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे बस, रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली.