महाराष्ट्राच्या सायकलिंगचे ‘चाक’ निखळले, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांचे निधन

अखेरच्या श्वासापर्यंत सायकलिंगसाठी जगलेले प्रताप जाधव यांचे रविवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली होती. डिस्चार्ज मिळण्याच्या एक दिवस आधी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. प्रताप जाधव यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दांडगा जनसंपर्क जोडलेल्या प्रताप जाधव यांच्या अकस्मात निधनामुळे महाराष्ट्र सायकलिंगचे सुसाट वेगाने धावणारे चाक निखळल्याची दुःखद भावना क्रीडा विश्वाने व्यक्त केली. त्यांच्या कारकीर्दीला आदरांजली वाहण्यासाठी राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष असलेल्या प्रताप जाधव यांनी आपले संपूर्ण आयुष्य सायकलिंग खेळासाठी समर्पित केले. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली. त्यांनी आपल्या कारकिर्दीदरम्यान मुंबई-पुणे आणि पुणे-नाशिक सायकल शर्यतींमध्ये विविध शर्यतींचेदेखील आयोजन केले होते. देशाच्या सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱया ‘जीवनगौरव’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रताप जाधव यांना गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सन्मानित करण्यात आले होते. प्रताप जाधव यांनी 1977 ते 1987 दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली. यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदकविजेती कामगिरी केली होती. जाधव यांनी दोन वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 1993 पासून राज्य तसेच राष्ट्रीय सायकलिंग संघटनेत विविध पदांवर काम केले. संघटक म्हणून आपल्या 40 वर्षांच्या काळात प्रताप जाधव यांनी 23 वेळा मुंबई-पुणे सायकल स्पर्धा, 15 वेळा एमटीबी, चार वेळा रोड आणि एकदा ट्रक अशा 20 राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा, 10 वेळा राष्ट्रीय शालेय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.

सायकलपटूंची श्रद्धांजली

रविवारी सकाळी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘आपलं पुणे सायक्लोथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. प्रताप जाधव यांनी शनिवारी रात्रीदेखील दीपाली पाटील यांच्याकडून या स्पर्धेचा आढावा घेतला होता, मात्र स्पर्धेची तयारी सुरू असतानाच प्रताप जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याची बातमी समजली अन् स्पर्धेवरच शोककळा पसरली. सर्व खेळाडू, पदाधिकारी यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धाव घेतली. मात्र सायकलिंगसाठी आयुष्य वेचलेल्या प्रताप जाधव यांना अशी स्पर्धा बंद करणं आवडलं नसतं. म्हणून खेळाडूंनी पुन्हा स्पर्धास्थळी जाऊन एक राईड मारून गुरुवर्य प्रताप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली.