पोस्ट ऑफिसच्या नावाने मेसेज फिरतोय…सर्वात सुरक्षित आयफोनही सायबरचोरांच्या  हिटलिस्टवर

सायबर क्रिमिनल्स आता स्मार्टफोन युजर्सना मोठय़ा प्रमाणात लक्ष्य करत आहेत. फेक मेसेज पाठवून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. आता आयफोन वापरणाऱया लोकांसाठी  स्कॅमर्सने जाळे फेकले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सायबरदोस्त’ या सरकारी एजन्सीने आयफोन युजर्ससाठी आज अलर्ट जारी केला.

आयफोन युजर्सना पोस्ट ऑफिसच्या नावाने एक बनावट मेसेज पाठवण्यात येतोय. ‘तुमचे एक पार्सल पोस्ट ऑफिसच्या वेयरहाऊसमध्ये अडकलंय. त्यामुळे तुम्ही तुमचा पत्ता 24 तासांत अपडेट करा. अन्यथा तुमचे पार्सल परत जाईल,’ असे मेसेजमध्ये लिहिलेले असते.  तसेच पत्ता अपडेट करण्यासाठी लिंक दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केले की युजर्सची माहिती काढून घेतली जाते आणि ऑनलाईन स्कॅम होतो. अशा प्रकारची फसवणूक झाल्याची माहिती अनेकांनी सोशल मीडियावर दिली. त्यामुळे असा मेसेज आल्यास तत्काळ डीलिट करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. बँक डिटेल्स शेअर करू  नये.