
मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेज बनवण्यात आल्याची घटनासमोर आली आहे. या पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. याच प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नावाने हे पेज https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले आहे. यावर इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकण्यास सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे पेज बनवण्यात आल्याचं सांगितलं आहे. यातच विद्यार्थ्यांनी व पालकांनी सतर्क राहण्याचे आणि अधिकृत वेबसाईट व माध्यमांद्वारेच माहितीची खात्री करूनच पुढील पाऊल उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठ किंवा त्याच्या वतीने कुठल्याही अशा माध्यमातून प्रवेश प्रकिया राबवली जात नाही, असे आवाहनही करण्यात आलं आहे.