हिंदुस्थानच्या ‘वजीर-एक्स’वर सायबर हल्ला, हॅकर्सने 1900 कोटींच्या क्रिप्टो करन्सीवर मारला डल्ला

क्रिप्टो करन्सी हे पैसे कमावण्याचे एक प्रभावी डिजिटल माध्यम म्हणून नावारूपाला येत आहे, पण क्रिप्टो करन्सीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ंिहदुस्थानचे क्रिप्टो करन्सी एक्सचेंज ‘वजीर- एक्स’वर मोठा सायबर हल्ला झाला. हॅकर्सनी मोठा डल्ला मारला असून एक्सचेंज वॉलेटमधून 23 कोटी डॉलर म्हणजेच 1,923 कोटींची डिजिटल मालमत्ता चोरली आहे. मल्टीसिग वॉलेटमधील एक सुरक्षा भंग झाल्याचे पंपनीकडून सांगण्यात आले आहे.

‘वजीर-एक्स’वर झालेल्या सायबर हल्ल्याच्या मागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचे समजते. या माहितीनंतर तत्काळ कारवाई करण्यात आली असून हिंदुस्थानी रुपये आणि क्रिप्टो करन्सी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चोरी झालेल्या क्रिप्टो करन्सींमध्ये शिबू इनूचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

‘वजीर-एक्स’ने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात लिहिलंय, ‘आमच्या मल्टीसिग वॉलेटपैकी एकाची सुरक्षा भंग झाली आहे. आमची टीम याचा योग्य तपास करत आहे. तुमच्या मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हिंदुस्थानी रुपया आणि क्रिप्टो काढणं तात्पुरतं थांबवलं जाईल. तुम्ही दाखवलेला संयम आणि समजून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद! आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू.’

– कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक नीरज खंडेलवाल यांनी म्हटलं आहे की, ‘वजीर-एक्स’ ही मार्पेटमध्ये आमचे स्पर्धक असले तरी या घटनेबद्दल मला वाईट वाटत आहे. हिंदुस्थानी वेब3 इकोसिस्टमसाठी ही बातमी चांगली नाही.

-‘वजीर-एक्स’वर झालेला हा हल्ला हिंदुस्थानच्या क्रिप्टो बिझनेससाठी मोठा झटका आहे. त्यामुळे क्रिप्टो एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी युझर्सची चिंता वाढली आहे.