एका केंद्रीय अधिकाऱयाची सुमारे बारा लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. विजय रजनीकांत साहा या आरोपीचे नाव असून त्याच्यावर सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे.
तक्रारदार हे केंद्र सरकारच्या विभागात काम करतात. जून महिन्यात ते त्यांच्या घरी होते. या वेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक लिंक आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले होते. ते प्रत्येक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी त्यांना ग्रुप अॅडमीनने शेअर मार्पेटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. ग्रुपमधील अनेक सभासदांनी शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यात त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. याच आमिषाला बळी पडून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्याने बारा लाख चौदा हजारांची गुंतवणूक केली होती. काही दिवसांतच या गुंतवणुकीवर त्यांना सोळा लाखांचा नफा झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती, मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्याकडे ग्रुप अॅडमीनने तीन लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले होते. त्यांनी ती रक्कम ट्रान्स्फर न करता त्यांच्याकडे मूळ रकमेसह परताव्याची मागणी केली होती. मात्र त्यांना अॅडमीनकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पालिसांत तक्रार केली होती. आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढून पोलिसांनी विजय साहा याला ताब्यात घेतले.