जुलै महिन्यात ग्राहकांवर रिचार्जचा भार वाढला. जिओ, एअरटेल, व्हीआयसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये 35टक्के वाढ केली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागलेय. पण त्याचवेळी बीएसएनएलने कोणतीही दरवाढ केलेली नाही. तसेच बीएसएनएलचे टॅरिफ प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरात अनेक ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत. आंध्रप्रदेशात तर बीएसएनएलची लोकप्रियता जबरदस्त वाढली आहे. आंध्रप्रदेशात 20 दिवसांत बीएसएनएलचे एक लाखापेक्षा अधिक सिमकार्ड ऑक्टिव झाले आहेत. तसेच बीएसएनएल कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकांच्या अनेक ठिकाणी रांगा लागत आहेत. बीएसएनएलचा हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे. कंपनीच्या कस्टमर बेस आणि सर्विसमध्ये सुधार झाल्याचे दिसून येतेय. जिओ, एअरटेल, व्हीआयने रिचार्ज प्लॅन महाग केल्याने बीएसएनएलला ग्राहक वाढवण्याची संधी आहे. बीएसएनएलने आपल्या नेटवर्क क्षमतेत सुधारणा केली आहे. अनेक नवे टॉवर उभारले आहेत. याशिवाय डेटा प्लॅन्समध्ये आकर्षक ऑफर दिल्या आहेत. अनेकांनी सिम पोर्ट केले आहे.
बिगर डेटाचा स्वस्त प्लॅन आणणार
रिचार्जच्या दरवाढीतून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) टेलिकॉम कंपन्यांना एक प्रस्ताव दिलाय. यामध्ये विदाऊट डेटा पण व्हॉईस आणि एसएमएसवाले रिचार्ज प्लॅन सादर करण्यास सांगितले आहे. साधारणपणे रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस, ओटीटी यांसारख्या एकत्रित सेवांचे पॅकेज मिळते. मात्र सर्वच सबस्क्रायबर्स या सेवा वापरत नाहीत. तरीही त्यांच्या खिशाला भुर्दंड बसतो.