पाकिस्तानला जाणारे घातक रसायन जप्त; चिनी जहाजावर कस्टमच्या अधिकाऱ्यांची झडप

आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेला सीएस हा रासायनिक घटक चीनमधून घेऊन पाकिस्तानकडे निघालेले एक जहाज तामिळनाडूमधील कट्टूपल्ली बंदरात रोखून सीमा शुल्क यंत्रणांनी हा माल जप्त केला आहे. प्रथमदर्शनी पाहता पाकिस्तानच्या जैविक आणि रासायनिक युद्धतंत्र कार्यक्रमासाठी हे रसायन वापरले जाणार होते, असे सीमा शुल्क अधिकाऱयांनी गुरुवारी सांगितले.

चेंगडू शिचेन ट्रेडिंग पंपनी लिमिटेडकडून 2560 किलो सीएस रावळपिंडी येथील संरक्षणविषयक पुरवठादार रोहेल एंटरप्रायझेसकडे पाठवण्यात येत होते. प्रत्येकी 25 किलो वजनाच्या 103 ड्रममध्ये साठवलेला हा माल चीनच्या शांघाय बंदरावर 18 एप्रिल 2024 रोजी ह्युंदाई शांघाय या जहाजावर भरला गेला. कराचीकडे निघालेले हे जहाज 8 मे 2024 रोजी कट्टूपल्ली बंदरात पोहोचले होते.

काय आहे सीएस
सीएस म्हणून ओळखला जाणारा ऑर्थो-क्लोरो बेंझिलिडेन मॅलोनोनिट्रिल, हा रासायनिक घटक अश्रुधूर आणि दंगल नियंत्रण उपकरणांमध्ये वापरला जातो. आंतरराष्ट्रीय करार आणि भारताच्या निर्यात नियंत्रण सूची अंतर्गत सूचिबद्ध केलेले सीएस हे दुहेरी वापराचे रसायन आहे. दंगल नियंत्रण एजंट म्हणून त्याचे नागरी अनुप्रयोग असले तरी जप्त केलेल्या 2560 किलो इतक्या मोठय़ा साठय़ामुळे त्याच्या संभाव्य लष्करी वापराबद्दल चिंता निर्माण होते.

– जहाजाच्या नियमित तपासणीत हा साठा सीमा शुल्क अधिकाऱयांना सापडला होता. भारताच्या विशेष रसायने, जीव, साहित्य, उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या निर्यात नियंत्रण यादीत नियंत्रित पदार्थ म्हणून हे रसायन असल्याचे आढळल्यावर तो ताब्यात घेण्यात आला. हा माल भारताने स्वाक्षरी केलेल्या वासेनार करारा अंतर्गतही हा माल सूचिबद्ध पदार्थ असल्याचे पुढील तपासात आढळून आले.

चीनकडे थेट बोट
चीन पाकिस्तानला इतरही ‘दुहेरी वापर’ वस्तूंचा पुरवठा करत असल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. नियंत्रित पदार्थांचा पुरवठा करण्याच्या नियोजनबद्ध आखणीमुळे पाकिस्तानच्या लष्करी प्रगतीसाठी चीनकडून होत असलेली मदत यातून अधोरेखित होत आहे. सर्व आंतरराष्ट्रीय करार, नियम-निर्बंध, नियंत्रणे यातून बेधडक धाब्यावर बसवले जात आहेत, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.