करीरोड, लोअर परळमधील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती गुरुवारी रात्री 9.45 ते शुक्रवार, 7 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हे काम 17 तास 15 मिनिटे चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात करी रोड, लोअर परळ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून अनेक ठिकाणी त्या जीर्ण झाल्या आहेत.
या जलवाहिन्यांना वारंवार गळती लागण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या कामात ‘जी दक्षिण’ विभागात रेसकोर्स येथे प्रत्येकी 1 हजार 450 व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्ती कालावधीत जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल मार्ग, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.