शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या सोन्या’ ला भाववाढीची प्रतीक्षा

‘पांढरे सोने’ म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला सद्यःस्थितीत सात हजारांच्या आसपास भाव आहे. त्यामुळे भाव वाढण्याच्या अपेक्षेपोटी हे ‘पांढरे सोने’ सध्या शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रच नसल्याने शेतकऱ्यांची भाववाढीची आशा मावळली आहे. कापसाला भाव कधी वाढणार, या चिंतेतच शेतकरी आहे.

अहिल्यानगर तालुक्यात 70 टक्के शेतकरी कापसाची लागवड करतात. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापसाची लागवड केली. ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कापसाची वेचणीसुद्धा पूर्ण झाली. त्यानंतर रब्बी हंगाम लागला. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी कापसाला पाणी दिले. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना दुसऱ्या वेचणीचा कापूस चांगला झाला होता. साधारण एका शेतकऱ्याला एकरी तीन ते पाच क्विंटल कापूस मिळाला आहे. मात्र, कापूस भाववाढीची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने आता कवडीमोल भावाने कापसाची विक्री करावी लागेल, हीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापसाचा भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. 6800 रुपयांपर्यंत बऱ्याच दिवसांपासून भाव होता. दोन दिवसांपासून सात हजारांच्या आसपास हा भाव गेला. सात हजारांवर कापसाचा भाव जात नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सुरुवातीच्या काळात कापसाला भाव कमी होता. मात्र, तो भविष्यात वाढेल आणि योग्य भाव मिळेल, या आशेवर बळीराजा आहे.

उधारी-उसनवारी द्यावी कशी?

कापसाला भाव वाढेल, या भरवशावर शेतकऱ्यांनी अजून कापूस घरातच ठेवला आहे. भाव वाढला तर लोकांची उधारी-उसनवारी मिटेल, बी-बियाणे, खतांचा प्रश्न मार्गी लागेल, या आशेवरच शेतकऱ्यांनी कापूस ठेवला आहे. परंतु भाव वाढत नसल्याने रब्बी हंगामात घेतलेली उधारी कशी भागवणार? या चिंतेत शेतकरी आहे.

कापूस खरेदी केंद्रच नाही

शेजारील गंगापूर तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर सात हजार 550 रुपये भावाची कागदपत्रे घेऊन नावनोंदणी सुरू झालेली आहे. तालुक्यातील अनेकांनी गंगापूरच्या कापूस केंद्रावर नावनोंदणी केली आहे. या केंद्रावर भविष्यात जास्त भाव मिळू शकतो; परंतु जाण्या-येण्याच्या गाडीभाड्याचा फटका बसणार आहे. त्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र तालुक्यात सुरू करणे गरजेचे आहे. आता कापसाचे प्रमाणही कमी झाले असले, तरी अनेक दिवसांपासून घरात भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कापसाला चांगला भाव मिळू शकतो, अशी चर्चा आहे.