संपूर्ण जग इंग्रजी नववर्षाचे स्वागत करत असताना जळगाव जिह्यातील पाळधीमध्ये मोठा राडा झाला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गाडीचालकाने हॉर्न वाजवला आणि कट मारल्याच्या कारणातून दोन गट एकमेकांशी भिडले. संतप्त जमावाने गावात दगडफेक करत दहा ते बारा दुकानांना आग लावली. वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली आणि मोठा फौजफाटा तैनात केला. सध्या पाळधी गावामध्ये गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 20-25 जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
गुरुवारपर्यंत संचारबंदी
पाळधी व लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत राहावे याकरिता भादंवि 2023 चे कलम 163 चे आदेश लागू करण्यात आला आहे. एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून पाळधी या संपूर्ण गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटे 3.30 वाजेपासून ते दि. 2 जानेवारी सकाळी 6.00 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
गुन्हेगारांना अटक करा
पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री काही राजकीय व्यक्तीच्या हस्तकांनी मुस्लिम समाजातील लोकांची दुकाने जाळून खाक केली व वाहनेसुद्धा जाळण्यात आली. या संपूर्ण प्रकाराची व घटनेची सविस्तर चौकशी करून जे गुन्हेगार प्रत्यक्ष घटनेत सहभागी होते व त्यांना प्रोत्साहन देणारे, पुरस्कृत करणारे त्यांनाही अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. नुकसानग्रस्त 12 कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.