दशक्रिया विधीमधील गावपुढाऱ्यांच्या भाषणांना आवर घाला!

हिंदू संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी हा पुण्यकर्माचा व मृत व्यक्तीच्या मुक्तीसाठी केला जाणारा अतिशय महत्त्वाचा विधी मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी दशक्रिया विधीप्रसंगी प्रवचन आणि काकस्पर्श झाल्यानंतर पाहायला मिळणारी श्रद्धांजलीच्या नावाखाली गावपुढाऱ्यांबरोबरच नेत्यांच्या भाषणांची मांदियाळी बघता, ‘नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ आली आहे.

खरे तर मृत व्यक्तीच्या मागे त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख होणे आवश्यक आहे. तसेच समाजात त्याच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा व त्याच्या कुटुंबाबद्दल चांगली माहिती समाजापुढे यावी म्हणून त्या व्यक्तीविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी गावातील एखाद्या व्यक्तीने थोडक्यात परिचय होईल अशी माहिती देणे अपेक्षित आहे. त्यानंतर उपस्थितांमध्ये गावातील, परिसरातील किंवा पै-पाहुण्यांपैकी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने श्रद्धांजली म्हणून भाषण करणे आणि शेवटी ज्या कुटुंबात दुःखद घटना घडली, त्या परिवारातील एका व्यक्तीने आभाराचे भाषण करून संबंधित दशक्रिया विधी समाप्त होणे त्याप्रसंगी गरजेचे आहे. परंतु काही विक्षिप्त स्वयंघोषित नेतेमंडळींना यावेळीही परिस्थितीचे भान राहत नाही आणि त्यांची ही ‘भाषण’ रूपी श्रद्धांजली या दुःखद प्रसंगात हास्यास्पद विषय ठरत आहे. मात्र, ज्या कुटुंबात दुःखद प्रसंग घडला, त्या कुटुंबातील व्यक्तींना यामुळे खूपच वाईट अनुभव येत आहेत. सध्या हे चित्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्रास पाहायला मिळत आहे.

बोलण्याचे थोडेही भान नसलेल्या व्यक्ती दशक्रिया विधीमध्ये कसेही आणि काहीही बोलतात. त्यामुळे अशी स्वयंघोषित नेतेमंडळी दशक्रिया विधीमध्ये उपस्थित सर्वांनाच राजकीय फायद्यासाठी वेठीस धरत आहेत. अशा प्रकारची प्रथा बंद व्हावी, यासाठी न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व युवकांनी गावातील दशक्रिया विधीमध्ये भाषणबाज गावपुढाऱ्यांना रोखण्यासाठी नवीन संकल्प केला आहे.