टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सांघिक कामगिरी केली. फायनलमध्येही हाच कित्ता गिरवत प्रत्येकाने आपली जबाबदारी ओखळून खेळ केला आणि टीम इंडियाला विजयी केले. यात हार्दिक पंड्याचाही मोलाचा वाटा आहे. क्लासनसारखा सेट झालेला फलंदाज आणि चौकार-षटकारांची आतषबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिलरचा अडसर त्याने दूर केला. यामुळे 140 कोटी देशवासियांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न साकार झाले.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडूंनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, विराट कोहली, मोहम्मद सिराज यांचे डोळे पाणावले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून टीकेचा धनी झालेल्या पंड्याने या विजयानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
गेल्या 6 महिन्यात आयुष्यात बरेच काही घडले. जे गेले होते ते पुन्हा आल्यासारखे वाटत आहे. कठीण प्रसंगात मी स्वत:वर नियंत्रण ठेवले. अनेकदा मला रडू वाटत होते, पण मी रडलो नाही. कारण माझ्या वाईट काळाचा आनंद घेणाऱ्यांना मला आणखी आनंद द्यायचा नव्हता आणि त्यांना कधीही मी आनंद देणार नाही. पण देवाची कृपा पहा… मला अंतिम षटक टाकण्याची संधी मिळाली… मी आता निशब्द झालोय, अशा भावना हार्दिक पंड्याने व्यक्त केल्या. तसेच त्याने ट्विटरवर एक व्हिडीओही शेअर केला. यात तो बडोदा आणि टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न असल्याचे म्हणताना दिसतोय.
Just a boy from Baroda living his dream and grateful for everything that’s come his way 🇮🇳🙏 Cannot ask for anything more. Playing for my country will always be the greatest honour ❤️ pic.twitter.com/jeHHjB7rtU
— hardik pandya (@hardikpandya7) June 29, 2024
हार्दिक पंड्याने वर्ल्डकपमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले. फायनलमध्येही त्याने फलंदाजीतील उणीव गोलंदाजीत भरून काढली. त्याने 3 षटकांची गोलंदाजी करत 3 विकेट्स काढल्या. यात क्लासन, मिलर या दोन महत्त्वाच्या विकेटसह रबाडाच्या विकेटचा समावेश आहे.
दरम्यान, पंड्याने या स्पर्धेत फलंदाजीत 144 धावा केल्या आणि गोलंदाजीत 11 विकेट्सही मिळवल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 151.57 एवढा होता. मोक्याच्या क्षणी त्याने खेळ उंचावल्याने टीम इंडियाला विजय मिळाला.