साय-फाय – चीनने टाळला मायक्रोसॉफ्टचा धोका

>> प्रसाद ताम्हनकर

काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट प्रणालीवर चालणाऱ्या संगणकांमध्ये अचानक त्रुटी निर्माण झाली आणि जगभरात खळबळ माजली. सायबर सुरक्षा फर्म CrowdStrike च्या एका अपडेटमुळे मायक्रोसॉफ्ट सिस्टम चालवणाऱ्या संगणकांवर अचानक निळी पीन दिसू लागली आणि त्याचा परिणाम जगातील अनेक एअरलाईन्स आणि हॉटेल, ई-कॉमर्स अशा अनेक सेवा विस्कळीत होणाऱ्यावर झाला. सगळीकडे नुसती खळबळ उडाली आणि चिंतेचे वातावरण पसरले. जगभरातील प्रमुख कंपन्या आणि व्यावसायिक चिंतेत असताना एक देश मात्र आपल्या देशातील सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा सुरळीत चालू ठेवून या सगळ्याची गंमत बघत बसला होता व तो देश म्हणजे चीन!

मायक्रोसॉफ्टच्या या त्रुटीमुळे चीनचे नुकसान न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये CrowdStrike फारसे कोणी वापरत नाही. स्वदेशी या मूलमंत्राचा वापर केल्याने चीन या धोक्यापासून सुरक्षित राहू शकला. चीनमधील अनेक देशी प्रमुख कंपन्या आणि व्यावसायिक हे अमेरिकन सॉफ्टवेअर वापरायला अनुत्सुक असतात. दुसरीकडे चीनपासून आपल्या सायबर सुरक्षेला सर्वाधिक धोका आहे असा अमेरिकेचा दावा आहे. या वादात चीनमधले व्यावसायिक स्वदेशी कंपन्यांची क्लाऊड सेवा वापरण्यास प्राधान्य देतात. चीनमध्ये अलीबाबा, टेन्सेट आणि हुआवेसारख्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या आहेत व जवळपास तिथली संपूर्ण क्लाऊड सेवा या कंपन्यांच्या ताब्यात आहे. चीनच्या या स्वदेशी धोरणामुळे तिथल्या प्रमुख कंपन्यांना फटका बसला नसला तरी चीनमध्ये कार्यरत असलेल्या काही परदेशी कंपन्यांना मात्र याची झळ सोसावी लागली. या कंपन्या मुख्यत्वाने मायक्रोसॉफ्टसारख्या अमेरिकन सॉफ्टवेअरवर अवलंबून आहेत. चीनच्या सोशल मीडियावर अगदी नगण्य लोकांनी मायक्रोसॉफ्टमुळे उद्भवलेल्या समस्येची पार नोंदवली. गेल्या काही वर्षांपासून चिनी सरकारी संस्था, प्रमुख कंपन्या, मोठे उद्योजक, पायाभूत सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी आपल्या इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीची जबाबदारी प्रामुख्याने तेथील स्वदेशी कंपन्यांकडे सोपवली आहे. विदेशी संस्थांची सेवा, तसेच विविध सॉफ्टवेअर ही चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात असे चीनचे मानणे आहे. त्यामुळे या विदेशी संस्थांवर कमीत कमी अवलंबून राहण्याचे धोरण चीनने ठेवलेले आहे. यामुळे मायक्रोसॉफ्टसारखे किंवा असेच एखादे जागतिक संकट निर्माण झाल्यास चीनचा सुरक्षा व्यवस्था, नागरी सुविधा, विमान सेवा आणि बँकिंग सेवा सुरळीत कार्यरत राहू शकतात. चीनच्या या धोरणाचा काही परदेशी तज्ञ आणि मीडिया ‘स्प्लिंटरनेट’ असा उल्लेख करते. विशेष म्हणजे अनेक देश सध्या या ‘स्प्लिंटरनेट’ धोरणाचा आपल्या देशासाठी गांभीर्याने विचार करत आहेत.

एकीकडे चीनच्या धोरणाविषयी पाश्चात्य देश नाराजी व्यक्त करत असले तरी अनेक देशांनी स्वत: देखील चीनच्या तंत्रज्ञानावर आपल्या देशात बंदी लादलेली आहे. 2019 मध्ये काही पाश्चात्य देशांनी चीनच्या हुआवे कंपनीच्या तंत्रज्ञानावर बंदी आणली होती, तर 2023 मध्ये ब्रिटनने चीनच्या टिक टॉक या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी जाहीर केली. स्वत: अमेरिकादेखील चीनला अ‍ॅडव्हान्स सेमी कंडक्टरचा पुरवठा होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील असते. अमेरिकेने आपल्या देशातील काही कंपन्यांना चीनच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यापासूनदेखील रोखलेले आहे. आपल्या हिंदुस्थानमध्येदेखील अनेक चिनी अ‍ॅप्स आणि गेम्सवर बंदी लादण्यात आलेली आहे.

संपूर्ण जग या मायक्रोसॉफ्टच्या त्रुटीमुळे गांजलेले असताना चिनी कर्मचारी आणि तेथील मीडियाने मात्र याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. अमेरिकेच्या एका तंत्रज्ञान कंपनीकडून चूक घडल्याने चिनी सोशल मीडियाने त्याची विशेष दखल घेतली. चीनमधील अनेक कर्मचाऱ्यांचा विकेंड नेहमीपेक्षा लवकर सुरू झाला. तेथील अनेक कर्मचाऱ्यांनी मायक्रोसॉफ्टचे आभार मानत कंपनीची फिरकी घेतली. त्या दिवशी चक्क ’Thank you Microsoft’ जोरदार ट्रेंड करत होते. इतर देशांतील मीडिया या घटनेची कशी दखल घेतो हे बघणे मनोरंजक असणार आहे.

[email protected]