Sonu Nigam- सोनू निगमच्या कार्यक्रमावर का झाली दगडफेक? प्रेक्षकांना हात जोडून सोनू निगम काय म्हणाला, वाचा सविस्तर

सोनू निगम हा त्याच्या मधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांमध्ये कायमच लोकप्रिय राहिलेला आहे. सोनू केवळ प्लेबॅक सिंगर म्हणून चाहत्यांच्या परिचयाचा नाही. देशासह परदेशात सोनू निगमच्या गाण्याच्या कार्यक्रमांना चांगलीच मागणी आणि पसंती आहे. नुकताच दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये सोनू निगमचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी सोनू निगमवर उपस्थितांकडून दगडफेक करण्यात आली. गर्दीतील काही जणांनी स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली होती.

सोनू निगमचा कार्यक्रम दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीटीयू) च्या इंजिनिफेस्ट 2025 मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी गर्दीतील काही जणांनी स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. हे लक्षात येताच, सोनूने सादरीकरण मध्येच थांबवले. सोनूने हात जोडून प्रेक्षकांना आणि जमलेल्या विद्यार्थ्यांना आवाहन केले. “मैं आपके लिए आया हूँ यहाॅं पे.. आपण सर्वजण चांगला वेळ घालवुया. मी तुम्हाला अधिक गाणी ऐकवून आनंद देईन. पण कृपया शांत राहा. अशी सोनूने चाहत्यांना यावेळी विनंती केली, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. त्याने आपल्या टीमच्या सदस्यांना दुखापत होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

सध्याच्या घडीला एखाद्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्याचा ट्रेंड हा रुजू लागला आहे. संगीताच्या कार्यक्रमामध्ये अनेक अतिउत्साही प्रेक्षक हे गायकाच्या अंगावर लांबून काहीतरी फेकून मारतात. यामध्ये चप्पल, जॅकेट, मोबाईल आदींचा समावेश असतो. त्यामुळे गायकांनाही दुखापतीला सामोरे जावे लागतात. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी अशा बेपर्वा वर्तनाचे बळी पडले आहेत.