
विधानसभा निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारविरोधात देशभरात आंदोलन पेटले आहे. ईव्हीएम हटावसाठी ठिकठिकाणी उठाव होत असून आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर तब्बल दीड लाखाचा जनसागर उसळला. काँग्रेसच्या वतीने आयोजित सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ईव्हीएमवरून भाजपावर कडाडले.
भाजपवाले कधी ईव्हीएमच्या माध्यमातून मते चोरतात तर कधी आमदार चोरतात. कधी तुमचे पेन्शन चोरतात तर कधी शेतकऱयांची एमएसपी, अशा शब्दांत खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
भाजपाचे लोक लोकशाहीच्या रुपाने मिळालेली ताकद संपवण्याचे काम करत आहेत. ते नैतिकतेच्या गप्पा मारतात परंतु, अनैतिकतेची कामे करतात, असे खरगे म्हणाले. केवळ काँग्रेसच नाही तर प्रत्येक संघटना संविधान वाचवू इच्छित आहे. त्यामुळे आपल्याला एकसंध राहून संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने काम करत आहेत, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे, असे खरगे म्हणाले.
11 वर्षांपासून भाजपाने लोकशाही कमजोर केली
भाजपाने गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने संविधान, संवैधानिक संस्था आणि लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खरगे यांनी केला. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले. पत्रकारांना तुरुंगात डांबले. भाजपचे नेते खुलेआम संविधान बदलण्यासाठी 400 जागांची मागणी करू लागले आहेत. अशावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी आणि मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रांमधून जनतेचे मुद्दे काँग्रेसने समोर ठेवले, ते देशाचे मुद्दे बनवले. आज या रामलीला मैदानावर तुम्ही सगळे इतक्या मोठय़ा संख्येने एकत्र आला आहात, कारण ते मुद्दे अजूनही संपलेले नाहीत, असे खरगे म्हणाले.
उद्या ताजमहलही तोडतील
मोहन भागवत यांनी 2022 मध्ये म्हटले होते. प्रत्येक मशिदीत शिवालय शोधण्याचे काम करू नका, 1947 पूर्वी धार्मिक स्थळांना जैसे थे ठेवण्यासाठी 1991 मध्ये कायदा बनवला गेला; परंतु तो कायदा आणि भागवतांनाही मोदी-शहा जुमानत नाहीत. उद्या ते ताजमहल, लाल किल्ला आणि चारमिनारही मुस्लिमांनी बनवला म्हणून तोडतील, अशी टीका खरगे यांनी केली.