उन्हाळ्यात वाशिष्ठी नदीकिनारी मगरींचा वाढता वावर, अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी होतात आक्रमक; दक्षता घेण्याचे आवाहन

उन्हाळ्यात वाशिष्ठी नदीकिनारी मगरींचा वावर वाढला आहे. त्यामुळे नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्यांना मगरींचा धोका वाढू लागला आहे. या मगरींपासून आता पोहणाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. मागील पाच वर्षात मगरींनी माणसावर किरकोळ हल्ले केले आहेत. जमिनीत पुरलेल्या अंड्यांचे रक्षण करताना समोरून येणाऱ्या माणसाच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत.

तळ्यांचे शहर म्हणून चिपळूण शहराची जशी ओळख आहे. तशीच मगरीचे शहर म्हणूनही ओळख आहे; मात्र, जशा शहरातील तळी संपल्या तसा मगरींचा अधिवासही कमी झाला. अलीकडे वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना पाणथळ जागा नष्ट केल्यामुळे मगरीचा अधिवासही कमी झाला आहे. अनेक वेळा शहरातील नाल्यात तर मोकळ्या रस्त्यांवर मगरी आढळल्या आहेत. सध्या सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाळा असे वातावरण आहे. त्यामुळे मगरी वाशिष्ठी नदीकिनारी वावरताना दिसतात.

चिपळूण पेठमाप भागातील नदीकिनारी मगरीचा वावर तेथील नागरिकांना दिसून आला. तेथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मगरी पाहून तेथून पळ काढला. मगरीच्या प्रजननाचा हंगाम सुरू असल्याने त्या आक्रमक असतात. मगर जमिनीवर माती उकरून अंडी घालते व घरट्यांचे संगोपन करते. एक-दीड महिन्यांत घरट्यांतील अंड्यांतून मगरीची पिले जन्मतात. अन्नासाठी त्या पाण्यात उतरतात. मगर पिल्लांना शिकार करून अन्न भरवत नाही तर मगरीची लहान पिल्ले पाण्यात उतरून कीटक व लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरीला रोजचे खाद्य फार कमी प्रमाणात लागत असल्याने त्या इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून साठवून ठेवत नाहीत. म्हणूनच मगर मोठ्या प्राण्यांची शिकार करत नाही.

कोणती काळजी घ्यावी?

खोल पाण्यात उतरताना, कपडे धुताना, पोहताना, काठालाच पाण्यात उतरून आंघोळ करताना, खोल पाण्यात, पाण्याजवळ जनावरे घेऊन जाणे टाळा. मगरीचा वावर दिसल्यास पाण्यात जाऊच नका. जनावरांना पाणी पाजताना काठावर उथळ जागेत जा. खोल पाण्यात उतरून कपडे धुणे टाळा. तसेच लहान मुलांना जपा.

येथे आढळतात मगरी

चिपळूण तालुक्यातील गोवळकोट खाडीकिनारी, नाईक कंपनी पूल, मुरादपूर, शंकरवाडी, खाटीकआळी, बाजार पेठेतील पुले, शिवनदीवरील पूल, गोवळकोट रोड परिसरातील नदी, नारायण तलाव, वीरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव आदी परिसर.

मगरी माणसावर फार हल्ले करत नाहीत; मात्र लहान मुलांवर हल्ले करतात. त्यामुळे नदीत पोहण्यासाठी जाताना लहान मुलांना कोणीही एकटे सोडू नका. शक्यतो ज्या भागात मगरींचे वास्तव्य आहे त्या भागात जाणे टाळावे, असे चिपळूणमधील वनप्रेमी अमय गोडबोले यांनी सांगितले.