सरपंचावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या उरण पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनातच बैठका

उरण तालुक्यातील पागोटे गावात ‘मस्साजोग’ची ‘कॉपी’ झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यापूर्वी एक दिवस आधी तेथील गुंडांनी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेतली होती. असाच प्रकार उरण तालुक्यातील पागोटे गावातदेखील झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पागोटे गावचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावरही हल्ला करणाऱ्या स्थानिक नामचीन गावगुंडांनी उरणमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनातच बैठका घेतल्या आहेत. गुंड व पोलीस यांचे साटेलोटे समोर आल्यानंतर पाटील यांचे संपूर्ण कुटुंब सध्या दहशतीखाली आहे. ‘मस्साजोग’ नंतर आता पागोटे गाव गुंडांच्या नकाशावर आल्याने गृहमंत्री, आता तरी उघडा डोळे आणि बघा नीट, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

उरण तालुक्याच्या पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर ९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयात घुसून महेश पंडित, किरण पंडित, सौरभ पाटील, जितेंद्र पाटील, सनी कैकाडी, मेघदूत कैकाडी या गुंडांनी जीवघेणा सशस्त्र हल्ला केला होता, पण सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याने अन्य गावकरी ताबडतोब धावून आले व पाटील यांचा जीव वाचला. वारंवार पोलिसांकडे दाद मागूनही गावगुंडांवर कारवाई होत नसल्याने माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघता काय, असा संतप्त सवाल शिवसेनेचे सरपंच कुणाल पाटील यांनी केला होता. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध होताच संपूर्ण उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला, पण अजूनही त्यांना अटक झालेली नाही.

पुन्हा हल्ला होण्याची भीती

महेश पंडित, किरण पंडित, सौरभ पाटील, जितेंद्र पाटील, सनी कैकाडी, मेघदूत कैकाडी या गुंडांवर कारवाई करण्याऐवजी ते स्वतःच पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात बैठका कसे घेतात. त्यांना कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे दिसत नाही काय, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान सारे गावगुंड मोकाट असल्यानेच आपल्यावर पुन्हा कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीतीदेखील शिवसेनेचे सरपंच कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

त्यांना अटक करणार कोण?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर हल्ला होऊनही हे गावगुंड खुलेआम फिरत आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून बैठका घेत असल्याने त्यांना अटक करणार तरी कोण, असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस मुद्दाम कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केला आहे. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले तरी ही कारवाई का होत नाही, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पाटील यांनी केला असून माझ्यासह सारे कुटुंब सध्या दहशतीच्या छायेखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.