मुंबईतील 12 अनधिकृत नर्सिंग होम, मॅटर्निटींवर गुन्हे; हायकोर्टात राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र

<<< रतींद्र नाईक >>>

मुंबईतील बेकायदा प्रसूतिगृह, नर्सिंग होमचा काळाबाजार उघडकीस आला आहे. मुंबई उपनगरातील गोवंडी, कांदिवलीत बेकायदा रुग्णालयांची संख्या अधिक असून मुंबईतील 12 अनधिकृत नर्सिंग होम, मॅटर्निटींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने याप्रकरणी हायकोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले असून निम्म्या रुग्णालयांविरोधात तपासणी तसेच खटले अद्याप प्रलंबित आहेत.

अग्निशमन नियम न पाळताच शहरात आयोजित केलेल्या एका आरोग्य शिबिरात 2019 साली एक अपघात झाला. त्या अपघातात तीन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी अ‍ॅड. मोहम्मद झैन खान यांच्यामार्फत हायकोर्टात 2021 साली जनहित याचिका दाखल केली. पालिका अनधिकृत रुग्णालयांवर कोणतीच कारवाई करत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी झोन सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ धवले यांच्या वतीने हायकोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केले आहे की, 2021 ते 2023 दरम्यान 12 बेकायदा नर्सिंग होम आणि मॅटर्निटी रुग्णालयांविरोधात मुंबई नर्सिंग होम नोंदणी कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्या दोन वर्षांत मुंबईत एकाही अनधिकृत नर्सिंग होम, मॅटर्निटीविरोधात तक्रार न आल्याने गुन्हे दाखल झालेले नाहीत. 12 पैकी तीन रुग्णालयांविरोधात अद्याप चौकशी बाकी असून इतर तीन रुग्णालयांविरोधातील खटले प्रलंबित आहेत. न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेत याप्रकरणाची सुनावणी 29 एप्रिल रोजी निश्चित केली.

कांदिवली, गोवंडीत सर्वाधिक

नियमांचे उल्लंघन करत सुरू असलेल्या अनधिकृत रुग्णालयांचा सुळसुळाट मुंबई उपनगरात जास्त आहे. कांदिवलीच्या संजयनगर येथे 1, समतानगर येथे 8 तर गोवंडीच्या शिवाजी नगर भागात 3 बेकायदा रुग्णालये थाटण्यात आली आहेत.