सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रेतवत झालेल्या पोलिसांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतप्त जमावाने रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको करूनही पोलिसांच्या नाकावरची माशी हलली नाही. शेवटी काही प्रतिष्ठतांनी मध्यस्थी केल्यानंतर मयत संतोष देशमुख यांच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजात वाढलेला आक्रोश पाहून पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या दुसऱ्या आरोपीला पुण्यात बेडय़ा ठोकल्या. दरम्यान, या हत्याकांडाच्या निषेधार्थ केज, मस्साजोग येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे परवा अपहरण करण्यात आले. दिवसाढवळय़ा घडलेल्या या थराराने बीड जिल्हा हादरून गेला. परंतु पोलीस मात्र काळझोपेतच होते. संतोष देशमुख यांचा शोध सुरू असतानाच त्यांचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी मंगळवारी केज, मस्साजोग परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. या वेळी जमावाकडून दगडफेकही करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको सुरू होता. पोलीस प्रशासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांचे तडकाफडकी निलंबन करून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर कारवाईचा अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमावाने रास्ता रोको मागे घेतला आणि मध्यरात्री संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोघांना अटक, तिसरा पुण्यात जेरबंद
संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी काल जयराम माणिक चाटे आणि महेश सखाराम केदार या दोघांना ताब्यात घेतले. आज पुण्यातून प्रतीक भीमराव घुले याला अटक करण्यात आली. हत्याकांडात सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकल मराठा सरपंच संघटनेचा रास्ता रोको
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे सकल मराठा समाज सरपंच संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या वेळी आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, तत्काळ आरोपींना अटक करा, अशी मागणी करण्यात आली. नायब तहसीलदार बाळदत्त मोरे, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.