मुंबईतील मानखुर्द परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका सावत्रबापाने आपल्या दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे.. याप्रकरणी गुरुवारी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीची आई घरकाम करत असून तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. तिने एका टेम्पो चालकाशी दुसरे लग्न केले होते. ते एका चाळीत भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेला दोन वर्षांची मुलगी होती. पत्नी घरकामाला गेली असताना त्या नराधमाने मुलीला प्रचंड मारले. तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या गुप्तांगात लाकडी ठोकळा टाकला. एवढ्यावरच तो न थांबता त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नराधमाने स्वत:ला वाचविण्यासाठी वेगळा बनाव रचला. त्याने आपल्या पत्नीला लाकडी ठोकळा वरुन पडून मुलगी बेशुद्ध झाल्याचे सांगितले. मुलीची आई धावत घरी आली आणि ती आरोपीसोबत मुलीला घेऊन रुग्णालयात धावली. रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र महिलेला नवऱ्यावर संशय आल्याने तिने रुग्णालयात त्याच्याशी भांडण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली, ज्या दरम्यान त्याने मुलीची हत्या केल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, बायकोच्या पहिल्या पतीची मुलगी असल्याने तो तिचा द्वेष करत होता. त्याने पोलिसांना सांगितले की, नवरा-बायकोत त्याला ती अडथळा वाटत होती. त्यामुळे वैतागून त्याने गुरुवारी तिची हत्या केली. आरोपीला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत, असे झोन 6 चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीला कलम 103(3), 64(2)(एफ), 64(2)(1), 64(2)(एम), 65(2), 66 आणि 238 अन्वये अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्याची कलमे लावली असली तरी, डॉक्टरांकडून बलात्काराबाबत अद्याप अहवाल आणि पुष्टी मिळालेली नाही.