स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि भिलवडी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दुचाकी चोरट्याला गजाआड केले आहे. सुदीप अशोक चौगुले (वय – 37, रा. पाटील गल्ली, भिलवडी) असे चोरट्याचे नाव असून, त्याने चोरलेल्या 21 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईची दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी यांना एकजण दुचाकी विक्री करण्यासाठी सांगलीवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगलीवाडी ते कदमवाडी दरम्यानच्या रस्त्यावर पाळत ठेवून सुदीप चौगुले याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे संबंधित दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने ही दुचाकी पलूस तालुक्यातील माळवाडीच्या आठवडा बाजारातून चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने तब्बल 21 दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याने भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, पलूस आणि सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी तीन दुचाकी तर जत, चिंचणी, वांगी, कडेगाव, तासगाव आणि आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा 21 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
प्रथमच पोलिसांच्या यादीवर
दुचाकी चोरटा म्हणून सुदीप चौगुले हा प्रथमच पोलिसांच्या यादीवर आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींची किंमत सुमारे 6 लाख 63 हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह भिलवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.