Crime News पैसे चोरते म्हणून दिले चटके

पर्समधून पैसे चोरते म्हणून आईने मुलीला बेदम मारहाण करून तिला चटके दिल्याची संतापजनक घटना मालाड परिसरात घडली. या प्रकरणी कुरार पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या महिला व बाल विकास विभागात काम करतात. गुरुवारी त्या काम करत असलेल्या हेल्पलाईनवर पह्न आला.

मालाड येथे एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून शरीरावर चटके देत असल्याचे सांगण्यात आले. कुरार पोलीस घटनास्थळी आले असता पैसे चोरले म्हणून चटके दिल्याचे आईने कबूल केले.

वाहन अपघातात दोघांचा मृत्यू

माहीम आणि भोईवाडा येथे झालेल्या अपघातात एक महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला. या प्रकरणी माहीम आणि भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी पहाटे सकाळी माहीमच्या मोरी सिग्नल येथे अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी जखमी महिलेला सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुसरी घटना शनिवारी दुपारी परळ परिसरात घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एक जखमी व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी या व्यक्तीला तातडीने केईम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्या व्यक्तीला मृत घोषित केले.

सराईत सोनसाखळी चोर गजाआड

धूम स्टाईलने मोटरसायकल चालवून पुरुषाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळालेल्या चोरटय़ाला अखेर अंधेरी पोलिसांनी अटक केली. हुसेन फय्याज अली सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत एकूण 14 गुन्हे नोंद आहेत. हुसेनला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे अंधेरी येथे राहतात. जानेवारी महिन्यात ते पत्नी सोबत अंधेरी पूर्व परिसरात आले. मॉर्डन डेअरी येथून जात होते. तेव्हा मागून दोन जण मोटरसायकलवरून आले. मागे बसलेल्या व्यक्तीने त्याच्या मानेवर थाप मारली. मानेवर थाप मारल्याने ते खाली पडले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. चोरटे हे सुसाट वेगात मोटरसायकल घेऊन पळून गेले.

घडल्याप्रकरणी त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. तपासासाठी पथक तयार केले. पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हुसेनला ताब्यात घेऊन अटक केली. हुसेन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. त्याच्या दुसऱया साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

हिप्नॉटिझम करून सोने लांबवले

वृद्धाला बोलबचन देत हिप्नॉटिझम करून सोने लांबवणाऱया दोघांना माहीम पोलिसांनी अटक केली. राजू कृष्णा शेट्टी आणि सुरेश माडेलकर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. शनिवारी ते साहित्य आणण्यासाठी माहीम परिसरात गेले होते. तेव्हा एक जण त्याच्याजवळ आला. त्याने ओळखले का असे सांगून संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने त्याच्या शाळेतील मित्राची नावे सांगितली. तेव्हा त्याने ओळखत नसल्याचे स्पष्ट सांगितले.

काही समजण्याच्या आत एकाने त्याच्या खिशात हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यावर मस्करी करत असल्याचे एकाने भासवले. काही वेळाने एकाने गळ्यातील चैन पाचशे रुपयाच्या नोटेत गुंडाळली तेव्हा तक्रारदार याने चेन देण्यास सांगितले. चेन खिशात ठेवल्याचे सांगत ते निघून गेले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने खिसा तपासला.

त्या खिशात चेन नव्हती. त्याला पकडण्यासाठी तक्रारदार हे धावत मागे गेले. काही अंतर गेल्यावर त्यातील एकाला पकडले. याची माहिती तक्रारदार याने त्याच्या मित्राला दिली. त्याच्या मित्राने माहीम पोलिसांना पह्न करून घडल्या प्रकाराची माहिती सांगितली. तक्रारदार याने माहीम पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्या दोघांना पोलिसांनी अटक केली.