अरे देवा! महाराष्ट्रात गुंडाराज, जंगलराज इत्यादी… इत्यादी

स्वारगेट बलात्कार, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची गावगुंडाकडून झालेली छेडछाड अशा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटनांचा क्रम थांबण्याची चिन्हे नाहीत. महाराष्ट्रात गुंडाराज आणि जंगलराजसारखी सध्या स्थिती आहे.

मिस युनिव्हर्स फेम अभिनेत्री नेहल चुडासामावर मुंबईत हल्ला

मिस युनिव्हर्ससाठी भारताचे प्रतिनिधित्व केलेली मॉडेल व अभिनेत्री नेहल चुडासामा हिला पाठलाग करून मारहाण करण्यात आली. हल्लेखोर गेले काही महिने तिचा पाठलाग करत होता. मुंबईत 16 फेब्रुवारीला या इसमाने तिला गाठत कारची काच फोडली. त्याने शिवीगाळ करत तिचा डावा हात पिरगळला आणि इतक्या जोरात थपडा मारल्या की तिचे कान बधीर झाले. तिच्या पोस्टनंतर पोलिसांनी या इसमाला अटक केली.

संभाजीनगरात विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न अमानुष हल्ला… डोक्यात दगड घातला, 15 वार केले

छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाण्यात एका विवाहितेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न झाला. अभिषेक नवपुते याने चाकूने चेहरा, पोट, हातावर 15 हून अधिक वार केले. ती रक्तबंबाळ अवस्थेत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घातला.