मानवतला मृत व्यक्तीवर गुन्हा; पोलीस, गृहखात्याचा अजब कारभार

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले. या गृहखात्याचा कारभार पोलीस हाकत आहेत. मानवतमध्ये याच पोलिसांनी चक्क मृत व्यक्तीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल करून गृहखाते किती जागरूक आहे, याचे उदाहरण दिले आहे. यापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनकर्त्याला पोलीस कोठडीत मारून ठार केल्याचा प्रताप राज्यभर गाजत आहे. मात्र, गृहमंत्री पोलिसांवर अभय देण्याचे कार्य चोखपणे सांभाळत आहेत.

शहर आणि परिसरात सध्या मानवत पोलिसांची गजब कारवाई चर्चेत आहे. 1 एप्रिल रोजी रत्नापूर येथील एका मृत व्यक्तीविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल झाला. मृतात्म्यावर गुन्हा कसा काय दाखल झाला? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी पान शॉपचालकाविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार शेख गाझीयोद्दीन शेख हबीब ऊर्फ मन्नू यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत रामकृष्ण बलभीम ताकट (रा. रत्नापूर) हा गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात त्याच्या पान शॉपमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असताना आढळून आला असल्याचे म्हटले आहे. यावेळी आरोपीकडून २५० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आल्याचेही म्हटले आहे. प्रकरणाचा तपास नारायण सोळंके करत आहेत. मात्र, अद्याप आरोपी अटक केलेला नाही. तपास अधिकाऱ्याला त्यांच्या सेवाकाळात हा आरोपी सापडणे शक्य नाही. कारण ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीने फेब्रुवारी १९९७रोजी आत्महत्या केली होती. तशी कागदपत्रेही ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत.

एरव्ही शहरात तंबाखूजन्य पदार्थ ज्यात गुटखा मोठ्या प्रमाणावर येतो. ही वाहतूक करणारे आरोपी पोलिसांना सापडतच नाहीत. परंतु, उघड गुपित असणारे पान टपरीचालक मात्र पोलिसांना नेमकेपणाने दिसतात. नुकतीच स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे तंबाखूजन्य गुटख्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 16 लाख रुपयांचा केवळ गुटखा जप्त केला. यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी व मानवत परिसरात हजारो रुपयांची देशी व विदेशी दारू मोठ्या बॉक्समध्ये भरून वाहतूक करीत असताना पकडली. परंतु, ही कारवाई मानवत पोलिसांना करणे कधीही शक्य झाले नाही.