आगामी वर्षी होणाऱ्या महिला प्रीमियर लीग (डब्लूपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी झालेल्या मिनी लिलावात 5 संघांनी 19 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 9.05 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी 4 खेळाडू करोडपती झाल्या. 5 परदेशी खेळाडूंवर 2.70 कोटी रुपये खर्च करण्यात आले. फिरकी गोलंदाज सिमरन शेख ही सर्वात महागडी खेळाडू होती, तिच्यासाठी गुजरात टायटन्सने 1.90 कोटी रुपये मोजले. एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेली (अनपॅप्ड) यष्टिरक्षक फलंदाज जी. कमलिनीने सर्वांना आश्चर्यचकित केले. तिला मुंबई इंडियन्सने मूळ किमतीपेक्षा 16 पट अधिक 1.60 कोटी रुपयांना खरेदी केले. वेस्ट इंडीजची डिआंड्रा डॉटिन ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू होती, तिला गुजरातने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतले. स्नेह राणा, हिदर नाइट आणि लॉरेन बेल यांसारख्या मोठय़ा खेळाडूंना कोणीच विकत घेतले नाही.
दुसऱया फेरीत 5 खेळाडू आधारभूत किमतीत विकल्या गेल्या. सारा ब्राइसला दिल्लीने, संस्कृती गुप्ताला मुंबईने, जोशिता व्हीजेला बेंगळुरूने प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकत घेतले. यूपी वॉरियर्समध्ये आरुषी गोयल आणि क्रांती गौर यांचा 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीत समावेश होता. अंतिम फेरीत 7 खेळाडूंची मूळ किमतीतच खरेदी झाली. ऑस्ट्रेलियाची लेगस्पिनर एलाना किंगला यूपीने, तर इंग्लंडचा गोलंदाज डॅनिएल गिब्सनला गुजरातने प्रत्येकी 30 लाख रुपयांना खरेदी केले. अंकिता माहेश्वरी 20 लाख रुपयांत मुंबईचा भाग बनली. दिल्लीने निक्की प्रसाद, गुजरातने प्रकाशिका नायक, बेंगळुरूने जगरवी पवार आणि राघवी बिश्त यांना विकत घेतले. चार खेळाडू प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकले गेले. मुंबईने नदिन डी. क्लर्कला 30 लाख रुपयांना विकत घेतले. तर दिल्ली पॅपिटल्सने एन. चरणी 55 लाख आणि नंदिनी कश्यपला 10 लाख रुपयांना खरेदी केले.
पहिल्या फेरीत 4 खेळाडू करोडपती
पहिल्या फेरीत 36 खेळाडूंची नावे आली. त्यापैकी 4 खेळाडूंची बोली एक कोटीच्या पुढे गेली. गुजरातने सिमरन शेखला 1.90 कोटी आणि डायंड्रा डॉटिनला 1.70 कोटींना खरेदी केले. तर मुंबईने अनपॅप्ड जी. कमलिनीला 1.60 कोटींना विकत घेतले. बेंगळुरूने प्रेमा रावत यांना 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले.