व्यायाम करताना किंवा खेळताना तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटकाने दगावण्याचे प्रमाण हल्ली वाढू लागले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना जालना जिह्यात घडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका क्रिकेट स्पर्धेत 32 वर्षीय विजय पटेल षटकार ठोकतो अन् त्यानंतर लगेच हृदयविकाराच्या झटक्याने खेळपट्टीवरच जीव सोडतो, असे सदर व्हिडीओमध्ये दिसत असून तरुणांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जालना शहरातील फ्रेजर बॉईजच्या मैदानावर ख्रिसमस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय पटेल फलंदाजी करत होता. त्याने षटकार ठोकला व सहकारी फलंदाजाशी चर्चाही केली. तो पुन्हा फलंदाजी करण्यासाठी वळला अन् काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने तो खेळपट्टीवरच कोसळला. त्याला खाली पडलेले पाहून इतर खेळाडूंनी त्याकडे धाव घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विजयचा मृत्यू नेमका कशाने झाला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानेच त्याला जीव गमवावा लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.