क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ख्रिसमसनिमित्त जालनामध्ये ‘ख्रिसमस ट्रॉफी क्रिकेट मॅच’ दरम्यान ही घटना घडली. विजय पटेल असे मयत खेळाडूचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जालन्यातील डॉक्टर फ्रेजर बॉयज मैदानात ख्रिसमस निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयही या स्पर्धेत सहभागी झाला होता. बॅटिंग करत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो मैदानात कोसळला.
विजयचे सहकारी आणि आयोजकांनी तात्काळ त्याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तत्पूर्वी विजयचा मृत्यू झाला होता. दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशाने झाला याची अधिकृत माहिती आली नसली तरी हार्टअटॅकमुळे मृत्यू
झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे विजयच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.