जनवंदना! जगज्जेत्यांचे अभूतपूर्व स्वागत, मरीन ड्राइव्हवर गर्दीचा महासागर

विश्वचषक जिंकणारा जगज्जेता हिंदुस्थानी संघ गुरुवारी मायदेशात परतला. सायंकाळी रोहित सेनेचे मुंबईत आगमन झाले आणि सागर किनारी स्वागताचा अभूतपूर्व सोहळा रंगला. नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या विजयी मिरवणुकीने गर्दीचे सारे रेकॉर्ड मोडले. मरीन ड्राइव्हवर क्रिकेटप्रेमींचा जणू महासागरच उसळला. या विजयपथावर डबलडेकर खुल्या बसमधून जगज्जेत्यांनी जनवंदना स्वीकारत मार्गक्रमण केले. त्यानंतर वानखेडेवर विजयीवीरांचे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

तब्बल 13 वर्षांची जगज्जेतेपदाची प्रतीक्षा हिंदुस्थानी संघाने 29 जूनला संपवली होती आणि अब्जावधी हिंदुस्थानींना टी-20 वर्ल्ड कप रूपाने जगज्जेतेपदाची अनमोल भेट दिली होती. आज मुंबईकरांनी आपल्या लौकिकास साजेशा स्पिरिटने चॅम्पियन्सचे स्वागत करत हे जगज्जेतेपद किती स्पेशल आहे हे दाखवून दिले. दीड तासाच्या अफाट आणि अचाट विजययात्रेत क्रिकेटप्रेमात भिजल्यानंतर जगज्जेत्यांचे वानखेडेवरही त्याच जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल सहा तास वाट पाहत असलेले क्रिकेटप्रेमी जगज्जेत्या हिंदुस्थानची पहिली झलक पाहून अक्षरशः भारावले. गेले सहा तास ते नाचत होते तर वानखेडेवर जगज्जेत्यांचा नृत्यानंद पाहून त्यांचीही पावले पुन्हा थिरकली.

वानखेडेवर पुन्हा विजयी परेड

तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली हिंदुस्थानी संघाने आयसीसी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा धोनीच्या संघाने वानखेडेवर विजयी अभिवादन केले होते. वानखेडेचा फेरा मारला होता. त्याआधी 2007 च्या जगज्जेतेपदानंतरही जगज्जेत्या संघाने आपला विजय सोहळा वानखेडेवरच साजरा केला होता. आज पुन्हा तोच विजय सोहळा आणि तशीच विजयी परेड वानखेडेला अनुभवायला मिळाली. हिंदुस्थानच्या जगज्जेत्यांना वर्ल्ड कपसह आपला आनंद साजरा करत क्रिकेटप्रेमींचे आभार मानले.

दोन्ही विजय सोहळय़ात रोहित

2007 साली हिंदुस्थानने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपच्या संघातही रोहित शर्मा होता आणि तब्बल 17 वर्षांनी हिंदुस्थानने त्याच्याच नेतृत्वाखाली दुसऱयांदा जगज्जेते होण्याचा मान मिळवला. या दोन्ही संघात रोहित शर्मा होता आणि अशा पद्धतीने त्याने आपल्या कारकीर्दीचा जगज्जेतेपदाचा वर्तुळ पूर्ण केला. 2007 सालच्या जगज्जेतेपदासह रोहितने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती आणि आता जगज्जेतेपदासह त्याने टी-20 मधून निवृत्ती पत्करली.

2007 ची आठवण ताजी

जगज्जेता संघाचे हिंदुस्थानातील आगमन तीन दिवस लांबणीवर पडल्यामुळे सर्वप्रथम मुंबईकरांनाच त्यांच्या स्वागताची उत्सुकता लागली होती. बुधवारी बीसीसीआयने अपेक्षेप्रमाणे हिंदुस्थान संघ मायदेशी परतत असल्याचे जाहीर करत जगज्जेत्यांची विजययात्रा मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट केले. तब्बल 17 वर्षांपूर्वी हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कपचे पहिलेवहिले जगज्जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईकरांनी जगज्जेत्यांचे अभूतपूर्व स्वागत केले होते. त्याच सुवर्णक्षणांची पुन्हा एकदा आठवण मुंबईकरांनी ताजी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

हिंदुस्थानी संघ 4 वाजता मुंबईत येणार असल्याचे कळताच मुंबईसह आसपासच्या उपनगरांमधून हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमींची पावले वानखेडे स्टेडियमच्या दिशेने वळली होती. दुपारी 3 वाजताच लाखो मुंबईकर वानखेडे आणि मरीन ड्राइव्ह परिसरात पोहोचल्यामुळे सारा परिसर क्रिकेटमय झाला होता. गेल्या वेळी जगज्जेत्या संघाची विजय यात्रा विमानतळापासून वानखेडेपर्यंत अशी 24 किलोमीटरची होती. जी तब्बल आठ तास चालली होती आणि या विजययात्रेत लाखो मुंबईकर जगज्जेत्यांबरोबर चालले होते. मात्र यावेळी केवळ एक किमीची विजययात्रा ठेवल्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज झाले होते आणि जगज्जेत्यांच्या स्वागतासाठी सारी गर्दी मरीन ड्राइव्ह आणि वानखेडेवर जमा झाल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मुंबईकरांनी आपले शिस्तीचे स्पिरिट दाखवत हा शॉर्ट अॅण्ड ग्रॅण्ड चॅम्पियन्स सोहळा संस्मरणीय केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

सामनाच्या ढोलताशावर नाचले जगज्जेते

टी-20 वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परतलेल्या हिंदुस्थानी संघाला जागोजागी मिळालेले अभूतपूर्व प्रेम पाहून साऱ्यांचे चेहरे आनंदित झाले होते. जगज्जेत्यांची विजययात्रा वानखेडेवर आल्यानंतर साऱ्यांनी अवघ्या हिंदुस्थानचे आभार मानलेच, पण वानखेडे दणाणून सोडणाऱ्या सामना ढोलताशा पथकाच्या ठेक्यावर अवघा हिंदुस्थानी संघ बेधूंद आणि बेफाम होऊन नाचला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे भन्नाट नृत्य पाहून उपस्थित क्रिकेटप्रेमींच्या अंगावर अक्षरशः शहारे आले होते. त्यांचा आनंद पाहून अनेकांचे डोळेही पाणावले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

हिंदुस्थानी जगज्जेते अब्जाधीश

तब्बल 13 वर्षांनंतर हिंदुस्थानला जगज्जेतेपदाचा आनंद देणाऱया क्रिकेट संघाला बीसीसीआयने सवा अब्ज म्हणजेच 125 कोटी रुपयांचा धनादेश देत सत्कार केला. या पुरस्काराने हिंदुस्थानी संघ मालामाल होणार आहे. 15 सदस्यीय संघासह 15 सहकारी स्टाफला हा पुरस्कार श्रेणीनुसार विभागून दिला जाणार आहे.