न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन दारुण पराभवांनी खचलेल्या हिंदुस्थानी संघाने पर्थवर पुन्हा एकदा स्फूर्तिदायक कामगिरी करून दाखवली. हिंदुस्थानने बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत तिसऱया दिवशी 6 बाद 487 धावांवर आपला डाव घोषित करत संघाला पर्थवर थेट विजयपथावर पोहोचवले आहे. सलामीवीर यशस्वी जैसवालने 161 धावांची खेळी करताना के. एल. राहुलसह 201 धावांची विक्रमी सलामी आणि त्यानंतर विराट कोहलीच्या तिसाव्या शतकाने पर्थचा तिसरा दिवस गाजवत ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे जबर आव्हान ठेवले. त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा सनसनाटी सुरुवात करत ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी केविलवाणी अवस्था केली आणि पर्थवर विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. आता पहिली कसोटी वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला उर्वरित दोन दिवसांत 522 धावांचा एव्हरेस्ट उभारायचाय तर हिंदुस्थानला अजून 7 विकेट टिपायचेत. त्यामुळे हिंदुस्थानच्या पर्थ विजयावर चौथ्या दिवशीच शिक्कामोर्तब निश्चित आहे.
हिंदुस्थानचा पहिला डाव 150 धावांत आटोपल्यावर अवघा देश हिंदुस्थानी संघावर तुटून पडला होता. पण तमाम हिंदुस्थानींचा राग बुमराने ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळून शांत केला आणि पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या यशस्वी जैसवाल आणि के. एल. राहुलने शनिवारी 172 धावांची अभेद्य सलामी देत पर्थ कसोटीवर घट्ट पकड घेतली होती. आज ती आणखी घट्ट केली, जी आता ऑस्ट्रेलियन संघाला काहीही केल्या सोडवता येणार नाही.
जैसवालचा यशस्वी खेळ सुरूच
यशस्वी जैसवालसाठी 2024 वर्ष खूप भाग्यशाली ठरले आहे. त्याने आपले शतक षटकार ठोकून साजरे केले. 205 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकार खेचत त्याने आपले चौथे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने वन डे क्रिकेटला साजेशा वेगात धावा काढल्या. त्याने राहुलसह केलेली 201 धावांची सलामीची भागी डावाला मजबुती देणारी ठरली. राहुल 77 धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलसह 74 धावांची भर घातली. मग विराटसह तो आणखी एक भागी रचत आपले कसोटी क्रिकेटमधील तिसरे द्विशतक ठोकण्याची शक्यता वाटत होती. पण त्याची खेळी 161 धावांवर मिच मार्शने संपवली. यशस्वीने या वर्षी धावांचा पाऊस पाडताना आतापर्यंत 1280 धावा केल्या आहेत. अजून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. त्याला अजून अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराटला शतकी सूर सापडला
गेल्या वर्षभरात विराटच्या बॅटीतून एकही शतक निघाले नव्हते. गेल्या सात कसोटींत त्याने 46, 12, 6, 17, 47, नाबाद 29, 0, 70, 1, 17, 4, 1, 5 अशा अपयशी खेळय़ांमुळे कधी नव्हे तो विराटच्या निवृत्तीचाही विषय निघाला होता. त्यामुळे विराटवर मोठय़ा खेळीसाठी दबाव होता आणि आज त्याने शतकासह ती अपेक्षा पूर्ण केली. तो खेळपट्टीवर आला तेव्हा हिंदुस्थान मजबूत स्थितीत होता. जैसवाल बाद झाल्यावर ऋषभ पंत आला. पण पंत आज काहीही करू शकला नाही. पुढे ध्रुव जुरेलही बाद झाला आणि 2 बाद 313 अशा सुस्थितीत असलेला हिंदुस्थान 5 बाद 321 असा संकटात सापडला. तेव्हा विराटने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत वॉशिंग्टन सुंदर संघाची पडझड रोखली. दोघांनी 89 धावांची भागी रचत संघाला 400 धावांचा टप्पा गाठून दिला. मग पदार्पणवीर नितीश कुमार रेड्डीने 27 चेंडूंत 38 धावा चोपून काढत संघाची आघाडी पाचशेच्या पुढे नेली. सोबत विराटनेही आपले विक्रमी 30 वे शतक पूर्ण केले आणि बुमराने 6 बाद 487 धावांवर आपला डाव घोषित केला.
विक्रमांची बरसात
ऑस्ट्रेलियातील आपल्या पहिल्याच कसोटीत शतक झळकवत यशस्वी जैसवालने एम. एल. जयसिम्हा (1967-68) आणि सुनील गावसकर (1977-78) यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. या दोघांनीही आपल्या ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी शतक ठोकले होते.
आपल्या पहिल्या चार शतकांना (171, 209, नाबाद 214, 161) दीडशतकात रूपांतरीत करणारा यशस्वी जैसवाल दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी फक्त दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम स्मिथनेच (200, 151, 277, 259) आपल्या पहिल्या चार शतकांना दीडशेच्या पुढे नेले होते. आता यशस्वीला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
वयाची 23 वर्षे पूर्ण होण्याआधीच चार दीडशतके ठोकणारा यशस्वी चौथा फलंदाज ठरला आहे. केवळ डॉन ब्रॅडमन यांनी 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी आठ शतके ठोकली होती आणि त्यापैकी पाच दीडशतके (254, 334, 232, 223, 152) तर चार द्विशतके होती. पाच दीडशतके ठोकली आहेत. ब्रॅडमन यांच्यासह मियांदाद आणि ग्रीम स्मिथ यांनी ही कामगिरी केली आहे.
यशस्वी आणि के. एल. राहुलने 201 धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च सलामी दिली. यापूर्वी 1986 मध्ये श्रीकांत-गावसकर यांनी सिडनी कसोटीत 191 धावांची सलामी दिली होती.
बुमराची भन्नाट सुरुवात
हिंदुस्थानने 534 धावांचे आव्हान उभारून आपला कसोटी विजय आधीच निश्चित केला होता. कसोटी इतिहासात चौथ्या डावात 500 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग कुणीही करू शकलेला नाही. चौथ्या डावात पाठलाग करून विजय मिळवताना वेस्ट इंडीजने 418 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ 534 धावा करणे निव्वळ अशक्य आहे. त्यातच फलंदाजीला उतरलेल्या पदार्पणवीर नॅथन मॅकस्विनीला शून्यावर पायचीत करत बुमराने खळबळजनक सुरुवात केली. पहिल्याच षटकात विकेट गेल्यामुळे कर्णधार पॅट कमिन्स नाइट वॉचमन म्हणून आला, पण तो सिराजच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराटच्या हाती झेल देऊन बाद झाला. मग बुमराने दिवसाच्या शेवटच्या षटकात मार्नस लाबुशनलाही पायचीत करत 12 धावांतच ऑस्ट्रेलियाचेही बारा वाजवले. अवघ्या 20 मिनिटांच्या खेळात ऑस्ट्रेलियाची झालेली दमछाक चौथ्या दिवशी फार मोठी मजल मारण्याची शक्यता कमीच आहे. जरी कसोटीचे दोन दिवस शिल्लक असले तरी पर्थचा निकाल चौथ्या दिवशीच लागणार हे निश्चित आहे.
अखेर 16 महिन्यांनंतर विराटने ब्रॅडमनना मागे टाकले
16 महिन्यांच्या दीर्घ अपयशी फॉर्मला सामोरा गेलेल्या विराट कोहलीने अखेर आपले 30 वे कसोटी शतक पूर्ण केले आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 कसोटी शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. 16 महिन्यांपूर्वी त्याने ब्रॅडमन यांच्या 29 शतकांची बरोबरी साधली होती. आता तो शतकवीरांच्या यादीत चक्क 16 व्या स्थानावर आहे. सध्या खेळत असलेले ज्यो रुट (35), केन विल्यम्सन (32) आणि स्टीव्हन स्मिथ (32) हे तिघे त्याच्या पुढे आहेत. तसेच हिंदुस्थानचे सचिन तेंडुलकर (51), राहुल द्रविड (36) आणि सुनील गावसकर (34) हे तीन दिग्गज शतकवीरांच्या यादीत विराटच्या पुढे आहेत.
गेली पाच वर्षे विराटचा कसोटी क्रिकेटमधील अपयशी फॉर्म संपता संपत नाहीय. 2019 सालापर्यंत विराटच्या नावावर 27 शतके होती. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा 51 विश्वविक्रमी शतकांचा विक्रम तोच मोडेल, असे सर्वांचे अंदाज होते. पण त्यानंतर त्याचा घसरलेला खेळ त्याला या विक्रमापासून शेकडो मैल मागे घेऊन गेला आहे. 2019 मध्ये विराटने ईडन गार्डन्सवर 23 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आपले 27 वे कसोटी शतक साजरे केले होते. ती त्याची 84 वी कसोटी होती. त्यानंतर तो गेल्या पाच वर्षांत 35 कसोटी खेळला आहे आणि त्याने या 62 डावांत 32.89 धावांच्या माफक सरासरीने केवळ 1941 धावा केल्या आहेत. या अपयशी खेळींमुळे 54 धावांच्या घरात असलेली त्याची सरासरी चक्क 48 धावांवर आली आहे. 27 व्या शतकानंतर तब्बल 40 महिन्यांनी विराटच्या बॅटमधून 28 वे शतक निघाले होते. 29 वे शतक त्याने 16 महिन्यांपूर्वी ठोकले होते आणि 30 वे शतक आज ठोकल.s विराटची बॅट ऑस्ट्रेलियात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच तळपली आहे. त्याने आज आपली ऑस्ट्रेलियन भूमीवरील सातवे शतकही साजरे केले आणि हे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण नववे कसोटी शतक होय. त्याने सातवे शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकरच्या ऑस्ट्रेलियन भूमीवरील सहा शतकांनाही मागे टाकले. गेल्या काही वर्षांत विराटची कसोटीतील शतकांची भूक कमी झाल्यामुळे तो कसोटीत धावा आणि शतकांच्या बाबतीत खूपच मागे पडला आहे.