
टीम इंडियाच्या श्रीलंकेशी होणाऱ्या सामन्यासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, टीम इंडियाच्या या निवडीवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची निवड करण्यात आली आहे. या निवडीवर अनेक चाहते संतापले आहेत. तसेच काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. शतक झळकवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान मिळाले नसल्याने त्यांनी बीसीसीआयला चांगलेच सुनावले आहे.
श्रीलंकेसोबत होणाऱ्या सामन्यातील संघात यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा यांची वनडे संघात निवड झाली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. तरीही त्याची एकदिवसीय सामन्याच्या संघात निवड झाली नाही. तसेच झिम्बाब्वे दौऱ्यावर अभिषेकने दमदार शतक झळकावले होते. त्याचीही संघात निवड झालेली नाही. यावर शशी थरूर यांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार शशी थरूर यांनी संघ निवडीवर टीका केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अभिषेकने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. त्याने त्याच्या दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावले होते. सॅमसन आणि अभिषेक या दोघांनाही एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळणे गरजेचे होते. मात्र, त्यांना वगळण्यात आले. सॅमसनला टी-20 संघात स्थान मिळाले. ही निवड मनोरंजक असल्याचा टोलाही त्यांनी बीसीसीआयला लगावला.
याबाबत शशी थरूर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड मनोरंजक आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनची वनडे संघात निवड झालेली नाही. तसेच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत टी-20 शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माची कोणत्याच संघात निवड झालेली नाही. त्यामुळे देशाच्या जर्सीतील यशाचा रंग निवडकर्त्यांसाठी इतका महत्त्वाचा असेल. तरीही संघाला शुभेच्छा., असे थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद करत संताप व्यक्त केला आहे.