टीम इंडियाचा खेळाडू सरफराज खान याचा भाऊ मुशीर खानचा अपघात झाला आहे. तो वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना त्याच्या वाहनाचा अपघात झाला. मुशीर खानची कार तीन- चारवेळा उलटली. या अपघातात मुशीर खान गंभीर जखमी झाला आहे. मुशीर खान आणि त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुशीर खान जखमी झाल्याने मुंबई संघाला धक्का बसला आहे.
इराणी चषकाचा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुशीर खानचा अपघात झाल्याने मुंबई संघाला धक्का बसला आहे. तसेच 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुशीर खान बाहेर पडण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये मुशीर खानने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत हिंदुस्थानच्या ब संघाकडून खेळला होता. मुशीरने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 181 धावा केल्या होत्या. मुशीर खानने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 15 डावात फलंदाजी करताना त्याने 51.14 च्या सरासरीने 716 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याने नाबाद 203 धावा केल्या होत्या.