
128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या क्रिकेटचे लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष व महिला गटाचे प्रत्येकी 6-6 संघ खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ही घोषणा केली. प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार 2028 च्या ऑलिम्पिकपासून क्रिकेटची फटकेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
संघ पात्रतेबद्दल अद्याप माहिती नाही
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र न्यूयॉर्क शहरात हे सामने होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया कशी असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यजमान कोटय़ानुसार अमेरिकेचा संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार एवढे निश्चित आहे. म्हणजेच अमेरिकेशिवाय इतर पाच संघ हे पात्रता प्रक्रियेतून निवडले जातील.
वेस्ट इंडीजमधून कोण खेळणार?
कॅरेबियन बेटांवरील जमैकासह ऑण्टिगा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनाडा, गयाना, सेंट लुसिया, सेंट विन्सेंट, सेंट किट्स अॅण्ड नेव्हिस, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ब्रिटिश व्हर्जिन आयलंडसारखे किमान 12 देश ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅरेबियन बेटांवर सहा देशांच्या क्रिकेट संघटना आहेत, जे एकत्रितपणे वेस्ट इंडीजच्या झेंडय़ाखाली क्रिकेटच्या मैदानात उतरतात. त्यामुळे जर वेस्ट इंडीजचा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला तर वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व कोण करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वेस्ट इंडीज संघात अनेक कॅरेबियन देशांचे संघ खेळत असल्यामुळे त्यापैकी ऑलिम्पिकमध्ये कोण खेळणार आणि विंडीजमधून कोण खेळणार, यावर ‘आयओसी’ला लवकर तोडगा काढावा लागणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये एकदाच खेळले गेले होते क्रिकेट
ऑलिम्पिकच्या इतिहासात केवळ एकदाच 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेलेले आहे. त्यावेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सच्या संघांनी त्यात भाग घेतला. ग्रेट ब्रिटनने सुवर्ण पदक जिंकले आणि फ्रान्सने रौप्यपदक जिंकले. स्पर्धेत दोनच संघ सहभागी झाल्याने ऑलिम्पिकमध्ये केवळ एकच अंतिम सामना खेळला गेला होता. त्यामुळे तब्बल 128 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा ‘रन’संग्राम बघायला मिळणार आहे.