मेलबर्न क्रिकेट स्टेडियम अर्थात एमसीजी म्हणजे क्रिकेटचा अद्भुत आनंद… कसोटी क्रिकेटला सर्वोच्च स्थान देणारे क्रिकेटप्रेमी वातावरण… क्रिकेटच्या आगळ्यावेगळ्या थराराची अन् संघर्षाची जुगलबंदी घडवून आणणारे क्षण उद्या गरुवारपासून बॉक्ंिसग डे कसोटीच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींना याची देही अनुभवता येणार आहे. तीन कसोटीनंतर 1-1 अशा बरोबरीत असलेली टीम इंडिया आणि यजमान ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झालेत. जो जिंकेल तो टिकेल, अशा स्थितीत असलेल्या रोमहर्षक बॉर्डर-गावसकर करंडकात दोन्ही संघांचे एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे फक्त विजय.
एमसीजीवर कसोटी अनिर्णितावस्थेत सुटणे आता जवळजवळ बंदच झाले आहे. आठ वर्षे आणि 12 कसोटींपूर्वी एमसीजीवर शेवटची कसोटी अनिर्णितावस्थेत सुटली होती. त्यामुळे या कसोटीचाही निकाल लागणार हे स्पष्ट आहे. विजयासाठी दोन्हीही संघ आसुसलेले असल्यामुळे आक्रमक खेळ आणि विजयासाठी संघर्ष होणार यात शंका नाही. यजमान ऑस्ट्रेलियाने गेल्या दोन कसोटींत हिंदुस्थानी संघापेक्षा वरचढ कामगिरी केली असल्यामुळे साहजिकच त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र या एमसीजीवर खेळल्या गेलेल्या गेल्या दोन कसोटींत हिंदुस्थानने संस्मरणीय विजयश्रीची नोंद केलीय. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ कोणत्याही भ्रमात नाहीय. चांगला खेळच संघाला विजयासमीप नेऊ शकतो याची कल्पना असल्यामुळे ऑस्ट्रेलिया इतिहास-भविष्यवाणी विसरून आपल्या वर्तमानाला समोर ठेवून आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.
संधी कुणाला… रेड्डी की सुंदरला?
नितीश रेड्डीने आपल्या अष्टपैलू खेळाने आतापर्यंत सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलेय. तरीही मेलबर्नवर हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन तीन वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची रणनीती आखतोय. यानुसार रेड्डीच्या जागी फिरकीवीर वॉशिंग्टन सुंदरला खेळविण्याचा विचार सुरू आहे, पण सुनील गावसकर यांना हा बदल चुकीचा वाटतोय. त्यांच्यानुसार हिंदुस्थानने चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरावे, असे मत व्यक्त केलेय. तसेही एमसीजीवर बहुतांश वेळा तीन वेगवान गोलंदाजांसह दोन फिरकीवीरच मैदानात उतरवले जातात. सध्या संघात फलंदाजीच्या क्रमावरून आणि गोलंदाजांच्या निवडीवरून संभ्रमाचे वातावरण असले तरी खेळपट्टीचा रागरंग पाहून अंतिम निर्णय नाणेफेकीपूर्वीच घेतला जाण्याची शक्यता आहे.
जैसवालला यशस्वी सलामी द्यावीच लागणार
पहिल्या कसोटीत अफलातून फलंदाजी करणाऱया यशस्वी जैसवालचा आक्रमकपणा गेल्या दोन्ही कसोटींत अयशस्वी ठरला आहे. हिंदुस्थानला मालिकेत आघाडी मिळवून द्यायची असेल तर यशस्वीकडून धमाकेदार सलामी अपेक्षित आहे. त्याच्या खेळावरच हिंदुस्थानचा पुढचा खेळ अवलंबून आहे. याची त्याला निश्चितच जाणीव असावी. यशस्वीपाठोपाठ शुभमन गिल आणि ऋषभ पंत हासुद्धा गेल्या दोन्ही कसोटींत काहीही करू शकला नाही. हे तिघेही आक्रमक खेळाच्या मानसिकतेचे असले तरी खेळपट्टीवर तग धरून उभे राहणे, हेसुद्धा त्यांचे कर्तव्य आहे. या तिघांपैकी कुणाची फलंदाजी एमसीजीवर धावांचा पाऊस पाडते, याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
रोहित शर्मा सलामीला उतरण्याच्या तयारीत
ऑस्ट्रेलिया दौऱयापूर्वी हिंदुस्थानचा सलामीवीर असलेला कर्णधार रोहित शर्मा आपल्या वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटीत खेळला नव्हता, मात्र दुसऱया कसोटीपासून तो पुन्हा संघात दाखल झाला खरा, पण यादरम्यान त्याला संघहितासाठी आपल्या फलंदाजीचा क्रम बदलावा लागला. पहिल्या क्रमांकावर खेळत असलेला रोहित ऍडलेड कसोटीत सहाव्या क्रमांकावर उतरला आणि त्याचे सारे गणितच चुकू लागले. आधीच फलंदाजीत अपयश त्याच्या मागावर होते आणि या मालिकेत अपयशाने त्याला सैरभैर केले आहे. गेल्या दोन कसोटींत 3 डावांत त्याला 10, 3, 6 अशा केवळ 19 धावाच करता आल्या आहेत. या अपयशामुळे त्याच्या निवृत्तीचेही वारे वाहू लागले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी रोहित सलामीला उतरण्याचा विचार करतोय, पण दुसरीकडे यशस्वी आणि राहुलची जोडी फोडणे संघासाठी घातकही ठरू शकते. यशस्वी कायमस्वरूपी सलामीवीर असला तरी तो गेल्या तिन्ही डावांत निप्रभ ठरला आहे तर रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला खेळण्याची संधी लाभलेल्या राहुलने 84, ना. 4, 37, 7, 26, 77 अशा खेळय़ा करत हिंदुस्थानकडून सर्वाधिक 235 धावा केल्या आहेत. राहुल सध्या संकटमोचकाच्या भूमिकेत असल्यामुळे तो कुठेही खेळू शकतो, पण रोहित सलामीला न उतरल्यामुळे त्याच्या फॉर्म गेला आहे असेही नाही. ऑस्ट्रेलियन माऱ्यापुढे तो अद्याप आत्मविश्वासाने खेळूच न शकल्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या क्रमातील बदल किती फायदेशीर ठरेल, याबाबत सर्वांना साशंकता आहे.
आतापर्यंत संघहिताची भूमिका घेणारा रोहित स्वतःचा फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी हिंदुस्थानच्या क्रमवारीत बदल करण्याच्या मानसिकतेत आहे. जर तो सलामीला उतरला तर राहुलला तिसऱ्या आणि शुभमन गिलला थेट पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळावे लागणार आहे. इतकी उलथापालथ संघाच्या पथ्यावर पडली तर ठीक, अन्यथा रोहितचे काही खरे नाही.
कोन्स्टासच्या पदार्पणावर सर्वांच्या नजरा
सुपर फॉर्मात असलेला सॅम कोन्स्टास वयाच्या 19 व्या वर्षीच ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण करतोय. संघात निवड झाल्यापासून सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा असल्यामुळे तो सर्वांच्या केंद्रिय स्थानी विराजमान झालाय. मॅकस्विनीला वगळून तो संघात आल्यामुळे त्याच्याकडून सर्वांना अपेक्षा आहेतच, पण खुद्द त्यालाही 90 हजार प्रेक्षकांची मनं आपल्या फलंदाजीने जिंकायचीय. कोन्स्टासने आतापर्यंत 11 प्रथम श्रेणी सामन्यात 718 धावा केल्या आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटीतही त्याच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडेल, असा ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गजांना विश्वास आहे.
बॉक्सिंग डे कसोटी संभाव्य संघ
हिंदुस्थान – यशस्वी जैसवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशन, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलॅण्ड.
थेट प्रक्षेपण सकाळी 5 वाजल्यापासून