फक्त बॉर्डर यांच्याच हस्ते करंडक प्रदान, सुनील गावसकरांची नाराजी

अॅलन बॉर्डर आणि सुनील गावसकर यांच्या नावावरून हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी मालिकेतील या करंडकाचे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र गावसकर सिडनी मैदानात उपस्थित असतानाही फक्त बॉर्डर यांच्याच हस्ते कसोटी मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला करंडक प्रदान करण्यात आला. याबाबत सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कसोटी मालिका 3-1 फरकाने जिंकणाऱया यजमान ऑस्ट्रेलियन संघाला ज्यावेळी ऍलन बॉर्डर यांच्या हस्ते बॉर्डर-गावसकर करंडक दिला जात होता, त्यावेळी सुनील गावसकर यांना स्टेजवर बोलावले नाही. ते सीमारेषेजवळ उभे राहून टाळय़ा वाजवत होते. ट्रॉफी प्रेझेंटेशनबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ‘मला तिथे करंडक प्रदान करण्यासाठी स्टेजवर उपस्थित राहण्यासाठी नक्कीच आवडले असते. अखेर हा बॉर्डर-गावसकर नावाचा करंडक आहे. ‘ऑस्ट्रेलियाने हा करंडक जिंकला याने मला काही फरक पडत नाही. ते चांगले क्रिकेट खेळले म्हणून ते जिंकले आहेत. मी हिंदुस्थानी आहे म्हणून करंडक प्रदानासाठी व्यासपीठावर जाऊ शकलो नाही, मात्र मला याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आधीच कल्पना देण्यात आली होती. हिंदुस्थानने करंडक जिंकला नाही किंवा मालिका ड्रॉ झाली नाही तर करंडक प्रदान कार्यक्रमासाठी तुमची गरज नसेल, असे मला सांगण्यात आले होते. या घटनेमुळे मी नाराज नाही, पण मला याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटले. कारण या करंडकाचे नाव बॉर्डर-गावसकर यांच्या नावाने आहे, त्यामुळे आम्ही दोघेही करंडक प्रदान सोहळय़ासाठी व्यासपीठावर उपस्थित असायला हवे होतो, एवढेच माझे म्हणणे आहे, असे सुनील गावसकर यांनी स्पष्ट केले. या प्रकाराबाबत पुरस्कार सोहळय़ानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सारवासारव करत गावसकरांची माफी मागितली.