आपल्या खुमासदार लेखन शैलीने क्रिकेटबरोबर संगीत, सिनेमा आणि पर्यटन विश्व गाजवत वाचक आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ‘चॅम्पियन’ क्रिकेट समीक्षक, सिने निवेदक, दै. ‘सामना’चे स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांची प्राणज्योत प्रदीर्घ आजाराने अखेर मालवली. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला आणि क्रीडा व सिने पत्रकारितेतील एक सिद्धहस्त लेखक काळाच्या पडद्याआड गेला. ते 74 वर्षांचे होते.
गेली पाच दशके आपल्या सिद्धहस्त लेखणीने क्रिकेटचे सामने जिवंत करणारे, आपल्या नजाकतभऱया शैलीने वाचकांना प्रवासवर्णनातून जगभ्रमंती घडवून आणणारे, आपल्या मिश्कील शैलीत सिनेमा आणि सिने कलाकारांचे चकचकीत विश्व उभे करणारे ऑलराऊंडर व्यक्तिमत्त्व अशी द्वारकानाथ संझगिरी याची ओळख बनली होती. त्यांनी आपल्या लेखन कारकीर्दीत हजारो लेखांसह 40 पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सचिन तेंडुलकर, देव आनंद यांच्यासह असंख्य दिग्गजांवर प्रचंड लिखाण केले आहे.
मुंबई महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असूनही संझगिरी यांनी आपल्या क्रिकेटप्रेमामुळे वर्तमानपत्रात क्रीडा समीक्षक म्हणून गेली पाच दशके गाजवली. त्यांनी क्रीडा पत्रकारितेत सक्रिय राहत हिंदुस्थानी क्रिकेटचे ओघवत्या आणि विश्लेषणात्मक वृत्तांकन करत अवघ्या क्रिकेट विश्वात आपला चाहतावर्ग निर्माण केला. संझगिरी हे हिंदुस्थानी संघाला 1983 आणि 2011 साली जगज्जेतेपदाचा करंडक उंचावताना पाहणाऱ्या मोजक्या क्रीडा पत्रकारांपैकी एक होते. गेल्या पाच दशकांत क्रिकेट जगताची मुशाफिरी करताना त्यांनी कसोटी क्रिकेट खेळणाऱया सर्व देशांचा दौरा केला.
11 वर्ल्ड कपचे नॉनस्टॉप रिपोर्टींग
1983 साली कपिलदेवच्या हिंदुस्थानी संघाला वर्ल्ड कप उंचावताना पाहण्याचे भाग्य ज्या मोजक्या पत्रकारांना लाभले त्यात संझगिरीही होते. त्यानंतर गेली चार दशके त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कपचे रिपोर्टिंग करण्याचा पराक्रम केला. सलग 11 वर्ल्ड कप रिपोर्टिंग करणारे ते एकमेव पत्रकार. यानिमित्ताने क्रिकेटच्या भ्रमंतीसह त्यांनी जगभ्रमंतीही केली आणि त्यानंतर प्रवासवर्णनांच्या माध्यमातून आपल्या वाचकांना जगाची सफर घडवून आणली. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कपसोबत दहावेळा हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी इंग्लडचा दौराही केला.
आजारपणातही लेखन थांबले नाही
15 नोव्हेंबर 2024 रोजी द्वारकानाथ संझगिरी यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केले. या वयातही विशेषतः आजारपणातही त्यांनी लेखन थांबवले नाही. दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्यांची दोन पुस्तके आली. ‘फिल्मीकट्टी’ हे त्यापैकीच एक. आजारपणातही द्वारकानाथ संझगिरी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होते. लेखन आणि टायपिंग जमत नसल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरूनच आवाहन करून काही लेखनिकांना जमवलं होतं. ‘वजन कमी झाल्याने एका जागी एका पोझिशनमधे बसणं कठीण जातं. त्यामुळे एकाग्रता कमी झाली, वाचन आणि लिखाण कमी झालं,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. ‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आनंदाच्या शाईत पेन बुडवून लिहायला फार मजा येते, पण आजारपणामुळे वर्ल्ड कपच्या शेवटच्या दोन मॅचेसबद्दल इच्छा असूनही लिहू शकलो नाही,’ याची खंत त्यांनी वर्ल्ड कपदरम्यान व्यक्त केली होती.
…जेव्हा देवही भेटायला घरी पोहोचतो
संझगिरींच्या मोहिनी घालणाऱया लेखांच्या शैलींमुळे वाचकच त्यांच्या प्रेमात पडायचे असे नाही, तर क्रिकेटचा देव असलेला ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरही त्यांचा फॅन झाला होता. त्यामुळे सचिन आपल्या क्रिकेटच्या जिगरी मित्रांसह अनेकदा संझगिरींच्या दादरमधील हेंद्रे कॅसलच्या घरी भेटीला आला होता, पण सचिनच्या येण्याची कधी कुणालाही खबर लागली नाही. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेटच नव्हे तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे स्टारही संझगिरीच्या 140 चौरस फुटांच्या राजमहालात येऊन गेलेत.
कला-क्रीडा जगतावर शोककळा
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने कला-क्रीडा जगतावर शोककळा पसरली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी संझगिरी यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
क्रिकेट व चित्रपट या दोन्ही विषयांवर चटकदार लिखाण करणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन धक्कादायक आहे. ते दैनिक ‘सामना’चे लोकप्रिय स्तंभलेखक होते. त्यांच्या जाण्याने क्रीडा विश्वाची मोठा हानी झाली. – संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. 38 वर्षांपासूनचा मित्र. अनेक आठवणी सुंदर शैलीत रंगवणारा व्यक्ती. लेखनातून डोळय़ांसमोर प्रसंग उभा करायचे. कर्करोगाशी झुंज देताना ते लिहायचे थांबले नाहीत. – हर्षा भोगले, क्रिकेट समालोचक
सिव्हिल इंजिनीअर द्वारकानाथ संझगिरी यांचे क्रिकेटचे लिखाण वाखणण्याजोगे आहे. अनेक वर्तमानपत्रांतील त्यांच्या स्तंभलेखनाने त्यांना प्रचंड दाद मिळवून दिलीय. असा थोर क्रीडा समीक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे. – शरद पवार, माजी अध्यक्ष (आयसीसी)
मैदानानंतर वर्तमानपत्रातही क्रिकेटचा सामना रंगवणारा अस्सल पत्रकार क्रिकेट विश्वाने गमावला. – अजिंक्य नाईक, अध्यक्ष, मुंबई क्रिकेट संघटना
संझगिरींची साहित्यसंपदा
खेळ – शतकात एकच – सचिन, चिरंजीव सचिन, दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी, खेलंदाजी, बोलंदाजी, चॅम्पियन्स, चित्तवेधक विश्वचषक 2003, क्रिकेट कॉकटेल, क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स, कथा विश्वचषकाच्या, लंडन ऑलिम्पिक, पॉवर प्ले, स्टम्प व्हिजन, संवाद लिजंड्सशी, स्टंप व्हिजन/क्रिकेट
गाथा, थर्ड अंपायर, इंग्लिश ब्रेकफास्ट
- प्रवासवर्णन – फिश ऍण्ड चिप्स, मुलुखगिरी, फिरता – फिरता, पूर्व अपूर्व, फाळणीच्या देशात, भटकेगिरी, ब्लू लगून, माझी बाहेरख्याली, जीन अँड टॉनिक
- सिनेमा/कलाकार – फिल्मगिरी, तिरकीटधा, ब्लॅक ऍण्ड व्हाईट, वो भुली दास्तान, आम्हांला वगळा, देव आनंद, लतादीदी, प्यार का राग सुनो, आशा भोसले-एक सुरेल झंझावात
- व्यक्तिचित्रण – अफलातून अवलिये / दशावतार, वल्ली आणि वल्ली
- विनोद – खुल्लमखिल्ली, स. न. वि. वि. /खुला खलिता
- सामाजिक विषय – तानापिहिनिपाजा, दादर-एक पिनाकोलाडा, रिव्हर्स स्वीप, वेदनेचे गाणे
पुस्तकांचे अर्धशतक हुकले
क्रिकेट हा द्वारकानाथ संझगिरी यांचा आत्मा होता, तरी सिनेमा, संगीत आणि पर्यटनात ते मुशाफिरी करत. या मुशाफिरीतून त्यांनी वाचकांना निर्भेळ आनंद दिला. आपल्या हलक्याफुलक्या शैलीतून हसतहसत शब्दचित्र उभे करत वाचकांच्या निराशा आणि दुःखाचा चेंडू त्यांनी सीमापार टोलवला. अलंकारिक लेखणी आणि चपखल उदाहरणांनी सजलेले फक्त क्रिकेटवरील लेखच नव्हे तर त्यांची प्रवासवर्णने म्हणजे पर्वणी. प्रवासवर्णनांच्या माध्यमातून त्यांनी वाचकांना जगाची सफर घडवली. संझगिरी यांनी विविध विषयांवरील जवळपास 40 पुस्तके लिहिली. आपल्या पत्रकारितेची पन्नाशी त्यांनी साजरी केली, मात्र त्यांच्या पुस्तकांचे अर्धशतक हुकले. संझगिरींनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यावर खास एक पुस्तक लिहिले, देव आनंद, आशा भोसले यांच्यावरही विशेष लिखाण केले.
संझगिरी यांनी नव्वदच्या दशकात एकपात्री स्टॅण्डअप टॉक शोला सुरुवात केली. असे हजाराहून अधिक कार्यक्रम त्यांनी केले. सुनील गावसकर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार, सचिन तेंडुलकरांच्या विक्रमी 35व्या कसोटी शतकानिमित्त त्यांचा सत्कार, 1971 च्या इंग्लिश मालिका विजेत्या हिंदुस्थानी संघाचा सत्कार आणि सचिन तेंडुलकरांचा सर्वात अलीकडचा त्यांची पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार अशा अनेक मोठ्या कार्यक्रमांची संकल्पना आणि अंमलबजावणीही त्यांनी केली. ‘बोलंदाजी’ या स्पोर्ट्स दूरचित्रवाणी हा कार्यक्रम ते करायचे. ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या अजून एका दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे ते पटकथा लेखक होते.